काहीच्या काहीच...
लोणच्याच्या बरणीसारखं तोंड बांधलेल्या एखादीनं स्काइपवर यावं आणि ’मै तुम्हारे बच्चे की माँ बननेवाली हूं’ असं म्हणावंं ... तुमच्यापासून जीवाला धोका असल्यानं सध्या दूरदेशी पळून गेली आहे आणि ज्यांना - ज्यांना याबाबत माहिती होती, त्या सगळ्यांना तुम्ही संपवून टाकलंत. एकाच वेळी दहा - पंधरा खून पाडलेत. शिवाय या कुकर्मात या माणसाचे सगळेच मित्र सहभागी होते, तरीही ’ये बच्चा तुम्हारा है’... असा दावा केला तर...? ना आवाज ओळखीचा, ना तपशील ओळखीचा, कशाचा - कशाचीच काहीही सूतराम संबंध नाही. पण अशा कुठल्याही तद्दन फोकनाड आरोपाला जर ’दावा’ म्हणून लोकांसमोर विशेषतः मिडियासमोर पेश केले जात असेल आणि त्याचे दिवसभर चर्हाट मिडियावर सुरु असेल तर समजावे निवडणूका जवळ आल्या आहेत. कोणाचा - कोणाशी काय संबंध हे काहीच माहिती नसताना अचानक असाच तो सय्यद शुजा दूरदेशी अवतरला आणि मै तुम्हारे बच्चे की... या स्टाइलने इव्हीएमचा गौप्यस्फोट करण्याच्या नादात काहीबाही बरळला.
कुठे सुरू झाला अन् कुठे संंपला हे न समजणार्या राजपाल यादवनं दि ग्रेट खलीला चितपट करण्याचं चॅलेंज द्यावंं, अंडरटेकरला उचलून धोबीपछाड देण्याचा दावा करावा, डब्ल्यूडब्ल्यूएफमध्ये उतरून सगळ्या पहेलवानांंना लोळवण्याचं आव्हान द्यावं, ज्यांंच्या चड्डीच्या वर राजपालचं डोकंही पोहचत नाही त्या पहेलवानांना जमिनीत गाडून टाकू म्हणून धमकावलं तर समजावे निवडणूका जवळ आल्या. चार - दोन पालिकांच्या निवडणुकीत विजय मिळावणारे खानदेशी गिरीश महाजन असेच चक्क बारामतीत जाऊन निवडणूक जिंकण्याची वल्गना करू लागले.
जवळच्या मित्रांमध्ये भांडणे होऊ लागली, अबोला होऊ लागला. तुम्ही एकाचीच बाजू घेता, म्हणून आरोप होऊ लागले. एखादा अपघात हा खूनच आहे, हे पटवून देण्यासाठी चर्चा आक्रमक होऊ लागली आणि तपास यंत्रणांच्या निष्कर्षांना अडगळीत टाकून प्रत्यक्षदर्शी असल्याप्रमाणे घटनाक्रम रंगू लागला की समजावं निवडणुका जवळ आल्या. गोपिनाथ मुंडे असतील नाहीतर न्यायधिश लोया असतील. सोराहबुद्दीन असेल नाहीतर इशरत असेल यांच्याबाबतीतही जो उठला तो बडबडू लागला.
नोटबंदी फसली, राफेलमध्ये घोटाळा झाला, अदानी - अंबानी आणि सुटबुटकी सरकार म्हणा नाहीतर तुम्ही भक्त. किंवा मागच्या सत्तर वर्षांचा हिशेब मागा, त्या काळात काहीच झालं नाही म्हणा नाहीतर तुम्ही ’परिवाराचे गुलाम’ अशा सोशल मिडियाच्या पोस्टवर कॉमेंट येऊ लागल्या की समजावं निवडणुका जवळ आल्या आहेत. असा अनुभव प्रत्येक पोस्टमागे आपल्या सगळ्यांनाच येत असतो. टोकाचाच विचार मांडायला हवा, आणि त्यातून भक्त की गुलाम हे ठरवलं जावं असाच अट्टाहास सगळ्या पोस्ट मागे आजकाल असतो.
घरातला मुलगा निष्क्रीय ठरला किंवा कामचुकार निघाला की आई आपसूक मोठ्या मुलीला काम सांगतेच की. पण मुलगा निष्क्रीय आहे हे म्हणायचं नाही. मुलगी मात्र आजीच्या पावलावर पाऊल ठेवणारी कर्तृत्ववानच आहे. तिच्या येण्यामुळे आता अख्खंं राजकारण पालथं होईल. तिला कामाला जुंपताच मुरब्बी लोकांमध्ये बघा कशी घबराट पसरलीय... असं चित्रं रंगविण्यात येऊ लागलं. किंवा मुलीने कर्तबगारी सिद्ध करण्यासाठी चक्क स्वतःच्या मुलांंसमोर बापासमोर आजोबाचं नाव का लावलंंय? असं कोणी विचारु लागलं की समजावं निवडणूका जवळ आल्या आहेत. प्रियंका गांधीच्या उत्तर प्रदेशातील एन्ट्रीनंतर असंच तर होतंय. प्रियंकाची निवड जाहीर होताच लगेच भाजप घाबरलं किंवा काँग्रेसमध्ये नवचैतन्य आल्याच्या बातम्या सुरु झाल्या. आजीसारखी दिसते, याशिवाय तिचं दुसरं कोणतं कर्तृत्व या लोकांनी अजून बघितलं हे मात्र कोणी सांगणार नाही.
एका कुलकर्ण्याच्या दुकानात शस्त्र सापडली तर थेट भास्कर कुलकर्ण्यापर्यंत पोहचून याची जातच ’तसली’ असं म्हटलंं जात असेल. आणि मुंब्रा - औरंगाबादेत कोणी इसिसचे अतिरेकी सापडत असतील तर अतिरेक्यांंना जात - धर्म नसतो, अशी सारवासारव होत असेल तर समजावं निवडणुका जवळ आल्या. ठाण्याच्या जितेंद्र आव्हाडांच्या गेल्या काही दिवसांतील प्रतिक्रिया वाचून बघा सगळं राजकारण समोर येतं.
मित्रांनो, हे असंच असतं... राजकारण - राजकारण आणि फक्त राजकारण. संभ्रम तयार करण्यासाठी आरोपांचा धुराळा उठवणंं, प्रत्यारोपांची राळ उडवणं. आगीत तेल ओतणं. कुंपणावरच्या मतदारांच्या मनात एक दहशत निर्माण करणं. एक खोटा आशावाद निर्माण करणं. कधी स्मारकांंना निधी देणं तर कधी निधीसह जागाही हडप करणं. कधी श्रद्धास्थानांची शाब्दीक विटंबना करणं तर कधी नवी श्रद्धास्थानं निर्माण करणं... सगळंच राजकारण... काहीच्या काहीच राजकारण.
आईचं ऐकलं तर ’श्रावण बाळ’ आणि बायकोचं ऐकलं तर ’जोेरू का गुलाम’ असे आरोप होऊ लागले, स्वयंपाकघरातून भांड्यांंचे आवाज वाढायला लागले तर.... तर याचा मात्र निवडणुुकीशी काही संबंध नसतोे... त्याचा काही इलाजपण नसतो, फक्त हे लक्षात ठेवा.



अप्रतिम
उत्तर द्याहटवाProud to be from Akola Raje
उत्तर द्याहटवा