मर्सिडीज, लॅण्ड रोव्हर, लॅण्ड क्रूझर, बीएमडब्ल्यू या गाड्या माजुरर्ड्या दिसतात. विनाकारण समोेरून येणार्या प्रत्येक गाडीवर डोळे वटारत निघून गेल्यासारखं वाटतं. आजुबाजुला कोणीही असो त्या गाड्या दखलही घेत नाहीत, असंच वाटतं. टाटा इंडिका, तवेरा, क्वॉलिस या गाड्या बघितल्या की पट्कन जुने दिवस आठवतात. एक काळ या गाड्यांनी गाजवला पण आता बिच्चार्या रखत - खडत, उसनं अवसान आणत धावताहेत असं वाटतं. असे अनेक स्वभाव या गाड्यांकडे पाहिल्यानंतर लक्षात येतात आणि आपसूक अनेक नेत्यांचे चेहरे गाड्यांच्या जागी दिसायला लागतात. गाड्यांच्या जगात जर निवडणुका झाल्या तर माणसातील कोणत्या स्वभाव गुणाशी साधर्म्य सांगणार्या गाड्या या रिंगणात असतील? ही कल्पना करणंही गमतीदार असतं...
मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे वर काही गाड्या कागदी कव्हरमध्ये गुंडाळलेल्या दिसतात. त्यांची कंपनी कोेणती, मॉडेल कोणते हे दिसत नाही कारण लॉन्चिंग होण्यापूर्वीची ती रोड टेस्ट असते. अशी रॅपरमधील गाडी दिसली की आजकाल आठवण होते ती प्रियांका किंवा पवारांच्या पार्थची. अद्याप त्यांचा प्रत्यक्ष परफॉर्मन्स समोर यायचाय, रोड टेस्ट सुरु आहे. खिळखिळी झालेली टाटाची इंडिका, तवेरा, क्वॉलिस दिसली की माया, ममता, पृथ्वीबाबा डोळ्यासमोर येतात. घासत - कुथत आपण पुढे जाण्याच्या प्रयत्नात असल्यासारखे. एकेकाळी शक्तीशाली असल्याच्या स्मृतिंच्या जोरावर आज चाकं फिरती ठेेवणारी. मर्सिडीज, लॅण्ड रोव्हर, बीएमडब्ल्यू या रॉबर्ट वड्रा, शशी थरुर, अमित शहा किंवा आपले हजारो बहिणींचेे रामभाऊ, लोढा, आव्हाडांची आठवण करून देतात. विनाकारण कोणावरही गुरगुरतील काय नेम? चेेहर्यावरचा तो ’दर्प’ लगेच जाणवतो. एकेकाळी क्रेझ आहे म्हणून घेतलेली, पण आता गाडी बदलायला परवडत नसल्याने मजबुरीने तिच हाकणार्या मध्यमवर्गीयाकडे असलेली स्वीफ्ट डिझायर बघितली की सोनिया, लालू, मुलायम आठवतात.
टोयोटाची इनोव्हा दिसली की पट्कन आठवतात ते पवार, गडकरी, स्वराज, गोर्हे, सुमित्रा महाजन ही मंडळी. आतल्या लोकांच्या वजनाचा काहीच फरक त्यांच्या परफॉर्मन्सवर पडत नाही. कोणत्याही रस्त्यावर परफॉर्मन्स एकदम कडक... टाटाच्या सफारीचं त्या उद्धव, राज, राणे यांच्याप्रमाणे... दिसतात एकदम डौलदार पण मायलेज आणि मेन्टेनन्सला परवडत नाही. शिवाय कुठे बंद पडल्या की थेट शोरुममधून माणसं आणावी लागतात दुरुस्तीसाठी. दोन्ही राणे बंधू, आदित्य किंवा नेत्यांची राजकारणात जेमतेम स्थिरावणारी मुलं आठवतात ती ह्युदाईची व्हर्ना पाहिली की. लहान - लहान गाड्यांमध्ये भाव खाऊन जाणारी आणि मोठ्या गाड्यांच्या गर्दीतही फार लहान न वाटणारी... हायवेच्या कडेला असलेल्या ढाब्यांमध्ये गर्दी आहे, असं वाटावं म्हणून ढाबेवाले काही बंद, बिघडलेल्या, जुन्या आणि नव्याने रंगविलेल्या गाड्या बाहेर उभ्या ठेवतात. त्या गाड्या पाहिल्या की अचानक अडवाणी, पंत, मनमोहनसिंग, अण्णा डोळ्यासमोेर येतात हो. इंजिनाची शक्ती आणि गाडीतील सुरक्षेचा विचार न करता प्रचंड वेगाने जाणार्या ऑल्टो, डस्टन गो, नॅनोे पाहिल्या की आपले नांदेडकर अशोकराव, राहुलभय्या आठवतात, आणि हसू येतं. अरे बाबा, तुझा जीव केवढा, धावतो किती... रेसमध्ये धावणार्या, उडणार्या, पडणार्या, तुटणार्या गाड्या पाहिल्या की डोळ्यासमोर येतात ते सर्वसामान्य कार्यकर्ते. ना डोक्यावर छप्पर, ना ड्रायव्हरशिवाय दुसर्याला बसायला जागा. बिच्चारी तिथल्या - तिथे रेसट्रॅकवर गोल - गोल फिरताना थोडा तोल गेला की उलटी- सुलटी होऊन लगेच धूर निघतो. तुटफूट ठरलेली.
अरे हो, हायवे वरुन जाणारा टिप्पर पाहिलाय का? आठवतो?... टेल लॅम्प बंद, इंडिकेटर बंद, वाळू - खडी - लोखंड काहीबाही भरलेलंं आणि तरीही सुस्साट म्हणजे एकदम सुस्साट चालणारा. कुठे वळेल आणि कुठली लेन बदलेल याचा काहीच अंदाज न येणारा. बेदरकार. कुठेही धडकला तरीही समोरच्याचेच नुकसान करणारा टिप्पर दिसला की कोण आठतंय... दुसरं कोण आठवणार? नरेंद्र - देवेंद्र... दुसरं आहेच कोण?
0 Response to "नेते आणि गाड्या"
टिप्पणी पोस्ट करा