येळी माय
’आई’ संपूर्ण ब्रह्मांड व्यापूनही दशांगुळं उरणारा हा शब्द. शब्द म्हणण्यापेक्षाही खरंतर ही भावना किंवा भावविश्वच. घरट्यातील मासाच्या गोळ्यांंना घास भरवून त्यांच्या पंखात बळ येईपयर्र्ंत त्यांची जोपासना करणारी आणि तेच पिलू आकाशात उंच भरारी घेत असताना घरट्यातून ते कौतूक पाहणारी पक्षीण... मनावर दगड ठेऊन आपल्या चिमुकल्याच्या प्राणांसाठी त्याला देवकीच्या स्वाधीन करणारी यशोदा... शिवबा घडविण्यासाठी त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहणारी, वेळप्रसंगी मार्गदर्शक आणि सल्लागार म्हणून सुनावणारी जिजाऊ... उपाशी लेकरासाठी अवघड बुरूजही सरळ वाटेप्रमाणे सहज उतरुन जाणारी हिरकणी... हीच तर आई. ’मॉं मुझसे नाराज होती है, तो बहोत रोेती है’ हे असं तिचं जिवापाड प्रेम... सगळं - सगळंच शब्दातीत. मग कोणी ही वेडी माया म्हणा, किंवा मायचं वेडेपण म्हणा...
अशी कशी येळी वो माये
आशी कशी येळी
बारा गाडे काजळ कुकु
पुरलं नाही लेनं
साती समदुराचं पानी
झालं नाही न्हानं
धरती वरलं चांदी सोनं
डागीन्याची तूट
आभायाचं चोयी लुगडं
ते भी झालंं थिटं
बरहमा, इस्नू रुद्र बाळ
खेळइले वटी
कोम्हायता फुटे पान्हा
गानं आलंं व्होटी
अशी कशी येळी वो माये
आशी कशी येळी
या कवितेत बहिणाबाईंनी पृथ्वी म्हणजेच धरित्रीची महती वर्णन केल्याचेे शब्दार्थ ध्यानात घेतल्यानंतर म्हणता येईल. ब्रम्हा, विष्णू, महेश पोटी असलेल्या या ’धरणीमाय’ची भव्यता, दिव्यत्व त्यांनी वर्णीले आहे. सात समुद्राचं पाणी असूनही न्हाणं न होणारी, बारा गाडे काजळ कुंकू असतानाही लेणं अपुरं पडणारी, संपूर्ण धरणीवरील चांदी - सोन्याच्या दागिन्यांमध्ये आणि आभाळाची चोळी - लुगडंही थिटं पडणारी भव्यता त्या व्यक्त करतात. पण या पुढेही बहिणाईंची ही कविता आपल्याला घेऊन जाते. पतिव्रत्याची परीक्षा घेण्यासाठी आलेल्या ब्रह्मा, विष्णू, महेशालासुद्धा बालक म्हणून पदराआड घेणारीही माय. तर परिस्थितीच्या ग्रहणातून आपल्या घराला सावरणारीही मायच. अशा प्रकारे पौराणिक संदर्भसुद्धा या अशिक्षीत (?) कवियित्रीच्या काव्यात येतात.
येळी म्हणजे वेडी माय - आईच्या प्रेमाला वेडाशिवाय दुसरी उपमाच नाही. तिचं हेच वेडेपण एका निराकार जिवाला जीवन देतं, तिच हेच वेडेपण त्या जिवावरील अनेकानेक संकटांना परतवतं, तिचं हेच वेडेपण जगण्याचं दिशादर्शक आणि ऊर्मीही होतं. ’आई’ची व्याप्ती समजवून घेतानाही हेच तर होतं. कशाहीही तुलना होऊ न शकणारं निस्सीम प्रेम हे केवळ वेड याच शब्दात सामावतं आणि म्हणूनच मग तिन्ही जगाचं स्वामीत्व असलेलाही आईविना भिकारी वाटू लागतो. म्हणूनच मग जन्मदात्रीइतकंच प्रेम जेव्हा शिवबा घडविणार्या आईबद्दल वाटतं त्यावेळी ती जिजाऊ होते, वैष्णवांच्या मेळ्यात तीच ’ज्ञानोबा माऊली’ होते.



0 Response to "येळी माय "
टिप्पणी पोस्ट करा