आभाळ व्यापून उरणारी बहिणाबाई...
बहिणाबाई - हे नाव तसं आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचं. त्यांच्या काही कविताही अभ्यासक्रमात असल्यामुळं ओळखीच्या. या कवितांमधील केवळ व्दिमितीय नव्हे तर त्रीमितीय किंवा त्यापेेक्षा अधिक प्रकारे अर्थ लावता येईल का? हा प्रश्न स्नेही डॉ. प्रद्योत गर्गे यांंच्या मनात आला, आणि त्यांनी तो किडा माझ्या डोक्यात घातला. मग काय, विचारचक्र्रं सुरू झालं. त्यातून बहिणाबाईच्या प्रत्येक शब्दाचे नवे आयाम उलगडत गेले. तरीही समाधान होत नाहिये. ग्रामीण बोलीभाषेतून काय ताकदीचे काव्य बहिणाबाईंनी साकारले आहे, याची जाणीव होतेय. त्यांच्या कवितांवर लिहीणं म्हणजे कठीणच, तरीही नेटानं तोडकं - मोडकं लिहिण्याचा प्रयत्न केलाय.
एका स्त्री मनाच्या अव्यक्त भाव, भावना, मनोव्यापार व्यक्त होणारं साहित्य म्हणजे बहिणाबाईचं काव्य. स्त्री मनाचा ठाव घेणं अशक्य असं म्हटलं जातं, पण इथं बहिणाबाईंनी प्रत्येक मनाचाच ठाव घेतलेला. आईची व्याप्तीही तशीच त्यांच्या साध्या - सोप्या, सहज आणि अहिरणी बोली भाषेतून आलेली. एकाच व्यक्तीने अशा विविध विषयांवर काव्य रचना केली, यावर खरंतर विश्वासच बसू नये, अशा अनेकानेक काव्यांचे हळूवार पदरर बहिणाबाईंनी मराठी साहित्य रसिकांसमोर खुले केले आहेत. कुठेही बोजड प्रमाण भाषेतील शब्दांचा वापर किंवा बहुतांश वेळा काव्याचे परिमाण झुगारुन देत ही ग्राम्य कवियित्री तिच्या भाषेत, रसिकाच्या भाषेत व्यक्त होते. शिवाय आपण व्यक्त होत आहोेत हा अभिनिवेष न बाळगता ती संपूर्ण समाजाची, समाजमनातील भावना म्हणून शब्दांची गुंफण करताना कुठेही मोठेपणाचा साधा स्पर्शही न झालेलं हे काव्य म्हणूनच ’ओवी’ या पावित्र्यापयर्र्ंत पोहचतं. कदाचित म्हणूनच आईने सहज आपल्या लहानग्याला त्याच्याच बोबड्या बोलांमध्ये जगण्याचं आध्यात्म सांगावं, आयुष्याचा अर्थ सहजतेतून सांगावा, त्याच्यावरील निस्सीम अव्यक्त प्रेम एका स्पर्शातून व्यक्त करावं, तसा काहीसा नव्हे तर तसाच भास बहिणाबाईंच्या या ओव्यांमधून होतो अन् त्यांची प्रत्येक ओवी प्रातिनिधीक आई होतेे. स्त्री सुलभ काव्यातील प्रेम, प्रेयसी या भाव - भावनांपेक्षाही अधिक एक आई म्हणूनच बहिणाबाई व्यक्त होतात. एका गृहकतर्र्व्यदक्ष पण तरीही अभिनिवेषशून्यतेने कर्तव्याच्या वाटेवरुन चालणार्या आईच्या प्रेमाचा स्पर्श, त्यांच्या प्रत्येक शब्दाला झालेला असल्याचे वाटून जाते. त्याच भावनेतून येणारे त्यांचे शब्द म्हणूनच आपल्या सगळ्यांना आपलेसे, आपुलकीचे वाटून त्यातून स्नेहाच्या एका गहिवराची अनुभूती मिळवून देतात.
१) सरोसती (सरस्वती)
बहिणाईच्या काव्य लेखनाची प्रेरणा काय? हा प्रश्न तसा अनुत्तरितच. संंसाराचा गाडा ओढताना वयाच्या तिसाव्या वर्षी तीन मुले पदरी असलेल्या एका विधवेचंं जीणं ही प्रेरणा? की संसाराचं रहाटगाडगं ओढायचं म्हणजे सुख - दुःखाचं कालवण आलंच हा कणखरपणा ही प्रेरणा? देवावरचा निस्सिम विश्वास आणि जनाबाईंच्या मदतीला आलेला पांडुरंग हिच त्यांची प्रेरणा? कुठल्याही साज श्रुंगाराशिवाय सुचणारे शब्द ही प्रेरणा की निसर्ग आणि भवतालच्या सगळ्यांंशी असलेलं अव्दैताचं नातं ही प्रेरणा?... बहिणाबाईंच्या काव्यामागची प्रेरणा काय असावी, याचा अंदाज बांधणे दुरापास्तच. पण सरोसती या कवितेत बहिणाबाई सरोसतीला म्हणजेच सरस्वतीला आपली प्रेरणाच नव्हे तर आईच मानतात. म्हणूनच त्या म्हणतात -
माझी माय सरोसती, माले शिकवते बोली
लेक बहिणाच्या मनी, किती गुपितं पेरली
किती साधेपणानं त्यांनी परमेश्वराशी एकरुपता साधत आपल्या शब्दांचं श्रेय त्या सरस्वतीच्या चरणी अर्पणही केलं. विद्या, संगीत, काव्याच्या या देवतेची लेक विद्येच्या देवतेशी अव्दैत होऊन तिच्या मनातील गुपितं सांगण्यासाठी तिच्या बोलीशी एकरुप होण्याचे जणू पसायदान मागते आहे. मनातील गुपितांचं शब्दरुपी बीज पेरुन ते उगविण्याचंंही वरदान बहिणाबाई पांडुरंगाकडे मागताहेत. त्या म्हणतात -
माझ्यासाठी पांडुरंगा, तुझं गीता भागवत
पावसात समावतं, माटीमधी उगवतं
किती सोप्या शब्दात त्यांनी गीता, भागवताचा अन्वयार्थ या धरित्रीशी जोडला आहे. ’जे पेरलंं, ते उगवतं’ हा निसर्गाचा नियम. आणि भगवान श्रीकृष्णानं सांगीतलेला कर्मयोग यांची अगदी साधी सोपी व्याख्या ही ग्राम्य कवियित्री सहजपणे करून जाते. गीता, भागवतातील तत्वज्ञान म्हणजे मानवी जीवनाची साक्षात मूल्यच. मानवी जीवनासाठी ही मुल्य आभाळभर मोलाची. जसा पाऊस अख्खं आवकाश व्यापून येतोे, मनावरील मळभ दूर सारतो आणि नव्या जीवनाला उभारी देतो... तेच तर बहिणाबाई म्हणताहेत. पावसात समावलेलं म्हणजे आभाळभर असलेलं हे तत्वज्ञान मातीतून नवीन जीवन घेऊन उगवतं. एका अर्थाने गीता, भागवताचे पावसाप्रमाणे आभाळभर तत्वज्ञान हे मातीमोल असलेल्या जीवांनाही नव्यानं उगविण्याची स्फूर्ती देणारंं.
बहिणाबाईंच्या कवितांमध्येे माणूस आणि देवातील अव्दैताचं नातं ओतप्रोेत भरलेलं आहे. मी म्हणजेच तू आणि तू म्हणजेच मी, हे त्या जग्तनियंत्याला सांगतात. त्या म्हणतात -
अरे देवाचंं दर्शन, झालं झालं आपसूक
हिरिदात सूर्यबापा, दाये अरुपाचं रुप
हृदयातील अरुपाचं रुप दिसणं हेच साक्षात परमेश्वराचं दर्शन आहे. आपल्या मनात आपण डोकावणं म्हणजेच परमेश्वर. आपल्याला आपण ओळखणं म्हणजेच ईश्वरप्राप्ती हे अनेक साधू - संतांंनी सांगीतलेले आधात्म बहिणाबाई मांडतात. हृदयात सूर्यदेव अर्थात आपणच आपला मार्ग आणि आपणच आपले वाटाडे, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार यापेक्षा वेगळं ते काय? आणि आजपयर्र्ंत समोेर न आलेलं हृदयातील निर्गुण, निराकाराचं, आपल्याच रुपाचं म्हणजे अरुपाचं दर्शन होणं हीच ईश्वरप्राप्ती. आता यात सूर्यबापा म्हणूनही भूमिका ही आपलीच. ’राह पकड एक चला चल, पा जाएगा मधुशाला’ बच्चनजींचे हे आध्यात्मही आपल्यातच दडलेल्या सूर्याला म्हणजे ऊर्जेला, आंंतरिक स्फूर्तीला एकाच दिशेने किंवा आध्यात्माच्या एकाच मार्गाने जात स्वतःला ओळखण्याचं आवाहन करणारेच.
आणि परमेश्वराशी इतकं एकरुप झाल्यानंतर त्याचे अस्तित्व जळी - स्थळी, काष्ठी - पाषाणी जाणवणारंच. म्हणून -
तुझ्या पायाची चाहूल, लागे पाना - पानामधी
देवा तुझं येनं जानं, वारा सांगे कानामधी
असंंही बहिणाबाई म्हणतात. मनापासून ज्याच्यावर प्रेम आहे, ज्याच्याशी एकरुप झालो आहोेत त्याच्या येण्याची चाहूल नक्कीच लागते. अंतरमनाचा आवाज ती चाहूल हृदयापर्यंत पोहचवतो. म्हणूनच समोर दिसत नसतानाही (अरूप असलेलं) आपलंं माणूस आपल्या अंतरंगात नेहमीच असतं. बाळाच्या आठवणींनी व्याकूळ होऊन दचकून उठणारी आई, किंवा कोणाचंही बाळ रडल्यानंतर आपल्याचा बाळाचा आवाज आहे, असं म्हणून धाव घेणारी आई... तिच्या कानातही हे असंच येणं - जाणं जणू वारा सांगत असतो. त्यामुळे सर्वत्र असलेला हा परमेश्वर हृदयातील अरुपाचं रुप दाखवित असतानाच तो सर्वव्यापी आहे, हा विश्वासच -
किती रंगवशी रंग, रंग भरले डोयात
माझ्यासाठी शिरिरंग, रंग खेये आभायात
असे बहिणाबाई सांगतात. हा सगळा सुख - दुःखाचा खेळ त्याचाच आहे. त्यानेच आपल्या आयुष्यात विविध रंग भरले आहेत. त्याचे हे रंग कधी स्वप्नरुपाने तर कधी अश्रुरुपांनी आपल्या डोळ्यातून पाझरतात. पण या सुख - दुःखाच्या रंगांपलिकडे, खेळापलिकडे बहिणाबाईंना तो अरुप परमेश्वर आभाळाच्या पोकळीत दिसतो. ऊन - सावलीचा किंवा रंग - बेरंगाचा खेळ तो श्रीहरी करतो, हा त्यांचा विश्वास.
मीच या जगाचा नियंता आहे, हे श्रीकृष्णाने गीतेत सांगीतलेले बहिणाबाई वेगळ्या मार्गाने सांगतात. त्या सरस्वती लेक होतात, पांडुरंगाचं गीता - भागवताचे तत्व मातीमोल जीवनातून उमलताना पाहतात. त्याचवेळी तुच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस हे तत्वज्ञान मांडत असतानाच त्या निर्गुण, निराकाराशी एकरुपही होतात आणि त्याचवेळी तोच या जगाचा नियंत्रक आहे, हेसुद्धा मान्य करतात. गीतासार म्हणावे अशीच ही कविता.



0 Response to "आभाळ व्यापून उरणारी बहिणाबाई..."
टिप्पणी पोस्ट करा