-->
महापौरपदाचा जुगाड यशस्वी

महापौरपदाचा जुगाड यशस्वी


मुंबईसह राज्यातील दहा महानगरांच्या महापौरपदाचे उमेदवार आता निश्चित झाले आहेत. भाजपने मुंबई महापालिकेत बॅकफुटवर येत नवी खेळी केली आहे, त्यामुळे मुंबईचा महापौर पुुन्हा शिवसेनेचाच होईल, यात आता शंका नाही. महापौर निवडणुकीचे वारे वाहत असतानाच अकोल्याच्या महापौरपदीही विजय अग्रवाल यांचे नाव निश्चित झाले... सर्वत्रच महापौरपदासाठीचे जुगाड यशस्वी झालेले दिसते आहे. 
--
मुंबईने शिवसेना - भाजपला समसमान कौल दिल्यानंतर पुढे काय, या प्रश्‍नाचे उत्तर आज मुख्यमंत्र्यांनी दिले. हे, उत्तर अपेक्षितच होते. ज्यांना राजकारणाच्या चर्चा करायची किंवा चॅनेेलवाल्यांसारख्या त्या घडवून आणायची हौस आहे, तेच केवळ मुंबईच्या महापौरपदासाठी विविध पक्षांच्या आकडेवारीचा खेळ मांडत होते. मूळात मुंबई शिवसेनेकडे राहावी, हीच सर्वपक्षीय नेत्यांंची इच्छा आणि त्याच दृष्टीने पावले पडत असताना मुंबईकर भाजपला शिवसेनेच्या इतक्या जवळ नेऊन ठेवतील, हे आश्चर्यकारक होते. पण त्यानंतर मुंबईचे महापौरपद कोणाकडे या प्रश्‍नाचे उत्तर म्हणजे ’उत्तर पाहून गणित सोडविण्याचा’ प्रकार होता. केवळ भाजपकडून शिवसेनेला कधी आणि कसा पाठिंबा जाहीर केला जातो, हे पाहण्याचीच उत्सुकता होती. तीसुद्धा चॅनेलवरील वांझोट्या चर्चांमुळे खूप ताणली गेली होती. पण त्याचे उत्तर मुख्यमंत्री फडणवीसांनी देऊन टाकलेे. भाजप महापौरपदासह कोणत्याही समितीसाठी निवडणूक लढविणार नाही, असे त्यांनी जाहीर केले. त्यातच भाजपचे सर्व नगरसेवक पादर्शकतेचे पहारेकरी म्हणून सभागृहात बसतील, असेही मुख्यमंंत्री म्हणालेे. 
ज्यांना राजकारणातील ’बिट्‌विन द लाइन्स’ कळतात, त्यांनाच मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचे पुढचे परिणाम आज लक्षात येणार आहेत. ज्या पक्षाचा महापौर आहे, त्या पक्षाच्या बरोबरीने संख्याबळ असलेले पारदर्शकतेचे पहारेकरी सभागृहात बसले तर सभागृह चालविणे येणार्‍या काळात किती अवघड होईल, हे सांगायलाच नको. कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेत सभागृहातील बहुमत अत्यंत महत्वाचे असते. तोच धागा नेमका पकडून हे पारदर्शकतेचे पहारेकरी शिवसेनेच्या महापौराला आणि इतर समिती अध्यक्षांना सत्ता नकोशी करतील, हे येणार्‍या काळात पहायला मिळणारच आहे. दोन तृतीयांश सदस्यांंनी मागणी केल्यानंतर किंवा त्यांनी विषय फेटाळून लावल्यानंतर... असे अनेक संदर्भ मुंबई महापालिका अधिनियमात दिसतात. म्हणजेच संपूर्ण सभागृहापैकी किमान सत्तर टक्के सदस्य एखाद्या विषयाच्या बाजुने असतील तरच सत्ताधार्‍यांची ठाकुरकी कायम राहते. इथे तर आता पन्नास - पन्नास टक्के सदस्यांमधील संघर्ष सुरु होईल. 
मुख्यमंत्र्यांनी भाजपची मुंबईतील भूमिका जाहीर केल्यानंतर पुढे काय होईल, हे लगेच मांंडणे अधिक घाईचे होऊ शकते, हे मान्य. परंतु, भाजपने बॅकफुटवर येतानाच शिवसेनेला मागेे खेचण्यासाठी कसे समिकरण मांडले आहे, हे या घोषणेतून अगदी स्पष्ट होतेय. कोणतेही पद न मिळालेले नगरसेवक सभागृहात सत्ताधार्‍यांना खूप घातक ठरतात. हे येणार्‍या काळात नक्कीच दिसून येईल. मात्र, आतापर्यंत लहान भाऊ म्हणून सभागृहात बसणारे नगरसेवक जसे गप्प होते, आणि अपारदर्शक कारभाराचे मूक दर्शक होते, तसेच जर पारदर्शकतेचे पहारेकरी मूक दर्शक झाले तर मात्र, भाजपने मुंबर्ईत केलेला आटापिटा व्यर्थ होता, असेच म्हणावे लागेल. त्यामुळे भाजपच्या या पहारेकर्‍यांना सजग ठेवण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवरच येऊन पडणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, महापालिकांमध्ये काय जुगाड होईल, याचा मुख्यमंत्रीच काय पण साक्षात देव जरी आला तरी त्याला थांगपत्ता लागणार नाही. या जुगाडातूनच सत्ता राबविली जाते, उपभोगली जाते आणि उबविली जाते...

- आठवण गावाकडची - 
महापालिका आणि जुगाड हे शब्द आल्यानंतर सगळ्यात पहिले आम्हा अकोलेकरांसमोेर नाव येते ते विजय अग्रवाल यांचे. पक्षात असताना किंवा नसताना ज्या एका माणसाभोवती अकोला महापालिकेचे राजकारण फिरत राहिले ते विजय अग्रवाल आता अकोल्याचे महापौर होणार आहेत. हाडाचा कार्यकर्ता, प्रचंड महत्वाकांक्षी आणि कायम राजकारण जगणारा माणूस कोण, असे जर अकोेलेकरांना विचारले तर ’विजुभाऊ’ हेच उत्तर मिळेल. भाजपच्या दिग्गज नेत्यांना सळो की पळोे करून सोडणारा, गेल्या निवडणुकीत बंडाचा झेंडा हाती घेऊनही निवडून आलेला आणि त्यानंतर अगदी राजमार्गाने पुन्हा पक्षात येेऊन आपले स्थान अढळ ठेवणारा होऊ घातलेला महापौर विजय अग्रवाल हे अजब रसायन आहे. कोणतेही तर्कट तिथे टिकणारे नाही. 
अकोल्यात २००४ मध्ये प्रचंंड पाणीटंचाई होेती. शहर कोरडेठण्ण झाले होते. निधी देण्यासाठी लोकप्रतिनिधी तयार होते, पण पाणी टंचाई, रोज निघणारे घागर मोर्चे यांचा सामना कसा करावा या प्रश्‍नाने अधिकारी आणि महापालिकेतील पदाधिकारी अक्षरशः घाबरलेले होते. त्यावेळी विजय अग्रवाल बहुधा मनपाच्या स्थायी समितीचे सभापती होते. एकीकडे खासदार धोत्रे, आमदार शर्मा, गव्हाणकर, बाजोरिया, तत्कालिन जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि अधिकारी बसलेले होते. पाणी टंचार्ई दूर कशी करायची, या प्रश्‍नावर खूप गंभीर चर्चा सुरू होती. आणि अचानक एक माणूस उठला... ओ, संजूभाऊ - लालाजी खूप झालेे. किती निधी देता आत्ता सांगा. मी पाणीपुरवठ्याची जबाबदारी घेतो, येऊ दे माझ्या घरावर मोर्चे. पंधरा दिवसांत पाणीटंचाईची तिव्रता कमी करून दाखवतो, असे म्हणाला. त्या गर्दीत तोेच माणूस मनात भरला. सगळ्यांनाच नको असलेली जबाबदारी स्वतःकडे मागणारा, स्वीकारणारा हाच माणूस म्हणजे विजय अग्रवाल. या घटनेेचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे. 
खूप धडपडा, प्रत्येक क्षेत्राची माहिती असलेला, राजकीय नानाकळा असलेला, धाऊन जाणारा असा हा माणूस आज महापौर होतोय. समाधान आहे. पण... सगळं करून आपल्याच बोलण्यातून आपल्याबद्दल गैरसमज निर्माण करणारा, उद्धट - उर्मट अशी प्रतिमा आपसूक तयार करणारा  माणूस म्हणजेही विजय अग्रवाल. अकोला शहराचे राजकारण महापालिकेच्या सभागृहातून चालत नाही, ते क्रिकेट क्लबमधून चालते. ते कोण - कोेण चालवतेे, हे नंतर कधीतरी. पण त्या लोकांचा नेता म्हणजे विजय अग्रवाल. आणि त्याच मंडळीनी स्वार्थासाठी अकोला शहराची वाट लावली हे उघड गुपित आहे. महापौर कोेणत्याही पक्षाचा असला तरीही क्रिकेट क्लबमधूनच ठेकेदारांच्या बिलांपासून सगळेे धंदे सुरू होते. यातूनच मग विजय अग्रवाल यांच्या नावावर एक बेभरवशाचा नेता असा शिक्का बसला. ज्यांची कामे होतात, त्यांना विजूभाऊ या नावाने कौतुक आहे, ज्यांची फसतात ते तिरस्कार करतात. कोण काय म्हणतोे, याकडे लक्ष देणारा हा भावी महापौर आहे, एवढे नक्की. मात्र, येणार्‍या काळात विजय अग्रवाल यांना बेभरवशाचा नेता म्हणून असलेला शिक्का पुसून काढावा लागणार आहे, आणि अकोल्याच्या विकासासाठी सर्वपक्षीय नेत्यांशी असलेली ’सेटींग’ वापरावी लागणार आहे...

0 Response to "महापौरपदाचा जुगाड यशस्वी "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel