मी लिहीता झालो...
जातीय अभिनिवेष, ताण - तणाव, इतिहासाची (चुकीची किंवा योग्य) पुनर्बांधणी यावरुन होणारे वाद - प्रतिवाद जोरात सुरू आहेत. कदाचित गेल्या अनेक वर्षांपासून हे असंच चालायचं म्हणून आपण त्याकडे बघतो, कट्ट्यावर बोलतो. काही ’कट्टर’ मतवाद्यांकडून या गोष्टी प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणतानाही आपल्याला दिसतात. नुकताच एक मित्र भेटला, कट्टर जातीयवादी. म्हणजे फेसबुकवर कॉमेंट टाकतानासुद्धा समोरच्या व्यक्तीच्या अडनावावरुन जात ठरवून मग लिहिणारा... मला म्हणाला, जात - पात काही नसते यार. काही दिवसांपूर्वी समाजाच्या ज्या लोकांकडे बघून मी वावरत होतो, त्यांच्याकडूनच घोर अपमानाचा सामना करावा लागला. एका क्षणात जातीसोबत माती खावी लागते, या तब्बल चाळीस वर्ष गोंजारलेल्या समजाला तडे गेले. तर मुद्दा हा की जात - पात प्रत्येक ठिकाणी पाहिली जाते, ती कशी हे कदाचित पुढे येईलही... पण तो काळ जरा नवीन होता. मित्रांचा गोतावळा घेऊन फिरण्याचा, जातीकडे पाहायला कोणालाच वेळ नव्हता की गरजही नव्हती. जिगरबाज मित्रांसोबत खामगाव पॉलिटेक्नीकचं पहिलंच वर्ष (१९९३ - ९४) आम्ही विद्यापीठ निवडणुकीच्या माहोलमध्ये गाजवलं होतं. जात नाही ती जात, याचा लवलेशही नव्हता. वाचनाची आवड सुरूवातीपासून असूनही कॉलेज, निवडणुका, टेबल टेनिसमुळे फारसं काही वाचत नसे. पण समजायला लागलेल्या वयापासून रोजचे वर्तमानपत्राचे वाचन सुरूच होते. एक लेख वाचनात आला. रामदासस्वामी शिवरायांचे गुरू नव्हतेच, हे पटवून देताना त्या लेखकाने ब्राह्मण आणि प्रस्थापित समाजावर प्रचंड गरळ ओकली होती. अत्यंत हिन, खालच्या दर्जाची भाषा आणि शब्द होते. आता ते आठवतही नाहीत. शिवाय तेव्हापासून गेल्या वीस वर्षांपासून त्या लेखाचा लेखक कायम असेच शब्द वापरतो, हे जाणून आता त्या शब्दांमधील धारसुद्धा बोथट झाली. किंवा आपापल्या राजकीय सोयीने लोक असं बोलत असतात, हेसुद्धा एका जातीची संघटना स्थापन करणार्या त्या लेखकाशी बोलल्यानंतर ध्यानात आलं असेल. पण त्यावेळी रक्त खवळलं होतं. असा कोणीही कसा एखाद्या जातीला शिव्या देताना रामदासांबद्दल घाणेरडं लिहू शकतो, याचा संताप होता. बराचवेळ त्यावर विचार सुरू होते... अन् अचानक लिहायला लागलो. पान - दोन पान लिहून काढलं, नेहमीप्रमाणे लिहून झाल्यानंतर आईला वाचून दाखवलं, तिला आवडलं आणि मग हे छापून यायला हवं म्हणून थेट एका ओळखीच्या पत्रकाराकडे गेलो.
या पत्रकार महोदयांशी ओळख होण्यामागेही असाच एक मस्त किस्सा आहे. आमच्या एका पत्रकार नातेवाईकाचा मित्र नागपूरला एका मोठ्या दैनिकात पत्रकार होता. ज्यावेळी त्याला कायमस्वरुपी नोकरीत घेण्याची वेळ आली, तेव्हा कळलं तो बारावी उत्तीर्ण झालेलाच नाही. त्याची नोकरी वांध्यात होती. मग आमच्या त्या नातेवाईकाने खामगावातून त्या पत्रकार मित्राची बारावी पास करून देण्याची ’व्यवस्था’ केली, अर्थातच ती या पत्रकार महाशयांना सांगून. त्यावेळी त्या दोघांची भेट घालून देण्याची जबाबदारी मी पार पाडली होती. तेव्ही मी असेल दहावीला.
माझा तो लेख घेऊन मी जेव्हा त्या पत्रकाराच्या कार्यालयात गेलो संध्याकाळची वेळ होती, ते महाशय तराटच होते. त्यांना वाचून दाखवलं, कदाचित त्यांना ते आवडलं नसावं. पण त्यांनी तू चांगलं लिहितोस असाच लिहित राहा असे सांगतानाच त्यांच्या वृत्तपत्रातील अग्रलेख मला वाचून दाखवला. तू लिहिलेले छापून येईल, असे आश्वासन तर त्यांनी मला दिले होते. बहुधा मी लिहिलेला तो लेख काही कधी छापून आला नाही...
पण आपण लिहू शकतो, हा विश्वास त्यातून मिळाला होता. कोणत्याही ताज्या घटनेवर लिहून मग मी घरी आईला, तर बाहेर टेबल टेनिस क्लबमधल्या मित्रांना वाचून दाखवत होतो. गावकरीने एका विषयावर प्रतिक्रिया बोलावल्या त्यात मैत्रिणीच्या शेजारी प्रतिक्रिया छापून यावी म्हणून मीही लिहिले अन् श्रुतीनेही. त्यावेळी पुन्हा वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाने उचल खाल्ली होती. त्या आंदोलनाबाबतही लिहीले, ते देशोन्नतीमध्ये संपादकीय पानावर छापून आले, मग काय... लोकसत्ता, तरुण भारत, लोकमत, देशोन्नतीतून वाचकांच्या पत्रव्यवहारात मी एक दिवसाआड वावरु लागलो...



0 Response to "मी लिहीता झालो..."
टिप्पणी पोस्ट करा