-->
’तिने’ यंत्रणेच्या मुस्काटात मारली

’तिने’ यंत्रणेच्या मुस्काटात मारली

सरकारी कामाचा अत्यंत विचित्र, विक्षीप्त आणि डोकं फिरवणारा अनुभव प्रत्येकाला कधी ना कधी आला असतो. इंग्रज सरकारचे अधिकारी असल्याच्या थाटात वावरणारे अनेक अधिकारी, कर्मचारी आणि मख्ख, मठ्ठ, निगरगट्ट झालेली यंत्रणा पाहिली की डोक्यात तिडीक उठतेच. त्यातच कारभार जर सरकारी रुग्णालयातील असेल तर... तर समोरच्याला उठून दोन मुस्काटात मारण्याची मनोमन इच्छा झाल्याशिवाय राहात नाही. सर्वसामान्यांचा आवाजच सरकारी रुग्णालयातील यंत्रणेपर्यंत आणि त्या यंत्रणेत असलेल्या मग्रुर, उद्धट, मस्तवाल, बेफिकीर कर्मचार्‍यांपर्यंत कधीच पोहचत नाही. दुसरा कुठलाच पर्याय नसलेले हजारो लोक या यंत्रणेकडून होणारा अपमान, हिडीसफिडीस सहन करूनही आणि असे जगणे पुन्हा नको म्हणत असताना गलितगात्र झालेले रुग्ण मस्तवाल यंत्रणेकडून ’जीवना’ची अपेक्षा करीत असतात. वारंवार माराव्या लागणार्‍या फेर्‍या, आपल्याच तोर्‍यात असलेले कर्मचारी आणि माणसाच्या संयमापेक्षाही त्याच्या अपमान सहन करण्याच्या क्षमतेची परीक्षा घेणारी वागणूक यातून डोक्यात तिडीक गेलेल्या ’तिने’ गलितगात्र झालेल्या नवर्‍याच्या मुस्काटीत एक जोरदार ठेऊन दिली... तिचा तो संताप, राग, उव्देग, नैराश्य याचे व्रण जरी नवर्‍याच्या थोबाडावर उमटले असले तरीही तिने लगावलेली थप्पड ही खर्‍या अर्थाने सरकरी रुग्णालयाच्या यंत्रणेच्या मुस्काटात मारली होती. मात्र, त्या ’थप्पड की गुंज’ ऐकण्याचे औदार्यही ही यंत्रणा गमावून बसलीये.
स्थळ मुंबईचं जे. जे. हॉस्पिटल... येणारे काही डॉक्टर कृतज्ञपणे सर जीजीभॉय यांच्या पुतळ्याच्या पाया पडून पुढे जाणारे... पण सर जमशेदजी जीजीभॉय यांनी ज्यांच्यासाठी हे रुग्णालय उभारले त्या रुग्णांना दुर्लक्षून पुढे निघून जाणारे... त्याच पुतळ्यासमोर काही शिपुर्डे तैनात केलेले... गरीब, पिचलेला दिसला की दरडाणे हीच त्यांची ड्युटी. याच ठिकाणी असलेले रेडिओलॉजी विभाग. तिथपर्यंत पोहचायचं तर खूप दिव्य पार करावं लागतं. जेजे हॉस्पिटलमधील अनेक डॉक्टर बाहेरच्या जगात सेलिब्रेटी. या सेलिब्रेटी डॉक्टरांकडून तपासणी करवून घ्यायची, तर तुमच्या संयमाची परीक्षा होते ती प्रत्येक सरकारी दवाखान्यात काढाव्या लागणार्‍या चिठ्ठीपासून. चिठ्ठी काढण्यासाठी रांग, मध्ये - मध्ये घुसणारे तिथल्या कर्मचार्‍यांचे ओळखीचे लोक, इथून खरी त्रासाला सुरुवात होते. मग एक - दोन - तीन - चार अशा वेगवेगळ्या पातळीवर तपासण्या झाल्यानंतर, नवशिक्या डॉक्टरांनी त्यांच्या अकलेचे तारे तोडल्यानंतर मुख्य डॉक्टर रक्त, लघवी, एमआरआय, सोनोग्राफी अशा तपासण्या सांगणार. या तपासण्या करण्यासाठी तारीख घ्यावी लागते. तारीख देणारे तिथले कर्मचारी जणू त्यांच्या बापकमाईतून तुम्ही वाटा मागता आहात, अशा आविर्भावात तारीख देणार. बरं ठरलेल्या तारखेवर गेल्यानंतरही तिथे भलीमोठ्ठी रांग आणि रांग डावलून आतमध्ये घुसणारे कर्मचारी, डॉक्टरांच्या ओळखीचे लोक, तुम्हाला ताटकळ ठेवतात. त्यातून मध्येच येऊन इथे बसू नका, इथे थांबू नका, अमूक इथे थांंबा असे अत्यंत घाणेरड्या आवाजात आणि तुसड्या स्वरात सांगणारे तिथले चपराशी. सगळं वातावरण डोक्यात जातं. ज्यांच्या भांडणाची शक्ती नियतीने, परिस्थितीने हिरावून घेतलीय त्यांना हे सगळं निमूटपणे सहन करावं लागतं. आपण अमरपट्टा घेऊनच आलोय किंवा इथला रुग्ण हा आपल्यामुळे जगणार आहे, अशी भावना झालेले माजुरडे कर्मचारी वेगवेगळ्या वेशात इथे फिरत असतात.
परिस्थितीने आणलेली वेळ, डोक्यात जाणारी मग्रुरी, प्रत्येक पातळीवर - प्रत्येक काऊंटरवर होणारा त्रास आणि ते दिव्य पार करून रेडिओलॉजी विभागापर्यंत आणलेल्या गलितगात्र झालेल्या नवर्‍याने ज्यावेळी ’तिला’ कागद हरवला म्हणून सांगीतलं, त्यावेळी तिने त्याच्या थोबाडीत जोरदार लगावून दिली... खरंतर त्या नवर्‍याला जीवंत ठेवण्यासाठीच तिची धडपड सुरु असताना हरवलेला एक कागद पुन्हा काढण्यासाठी काय त्रास सहन करावा लागेल, हे तिला आठवले असेल, सकाळपासून चपराशांची, परिचारिकांची दादागिरी आणि नवशिक्या डॉक्टरांचा तुसडेपणा आणि एकूणच यंत्रणेवरचाच संताप तिला अनावर झाला असेल... म्हणूनच तिने त्या यंत्रणेच्या मुस्काटात एक लगावून दिली. एखादा हिच थप्पड या यंत्रणेचा भाग असलेल्यांच्या मुस्काटात मारण्याची वाट पाहू नका, हेच वारंवर जेजेे हॉस्पिटलमध्ये सांगावसं वाटतं... पण ऐकणारं कोण?
(हा संपूणर्र् घटनाक्रम अजिबात काल्पनिक नाही. मी स्वतः जेजे हॉस्पिटलमध्ये चार - पाच तास असा दोन वेळा गेलो होतो.)

0 Response to "’तिने’ यंत्रणेच्या मुस्काटात मारली"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel