नुसती डासांचीच हिंमत वाढली असं नाही. तर झुरळंं, ढेकणं, चिलटांंचीही मुजोरी वाढली आहे. पूर्वी झुरळाला पाहून स्वयंपाकघरातून एखादी नाजूक किंचाळी आली तरीही ते झुरळ नाहीसं होत असे. डांबराच्या दोन पांढर्या गोळ्या पाहुनही ही झुरळं अशी पळायची जसे प्रामाणिक चार - दोन कार्यकर्त्यांना पाहून दलाली करणारे पळत असत. पण आताशा ही झुरळंं मंत्र्यांच्या अॅन्टी चेंबरमध्ये बसलेल्या दलालांसारखे किंवा संपूर्ण रस्ता खाऊन बिलं काढणार्या कंत्राटदारांसारखे मग्रुर झाले आहेत. उद्या कदाचित झुरळानं हल्ला केल्याचीही बातमी येऊ शकते. तोच प्रकार पालींचा. मोराचं पिस, अंड्याचं रिकामं टरफल भिंतीच्या कोपर्यात खोचलं की पाली गायब होत. बँकेचे हप्ते थकलेल्यांंप्रमाणे त्या अंदाज घेऊनच घरात येत. पण आताशा या पालीसुद्धा विजय मल्ल्यासारख्या किंवा बँकांचे हप्ते थकविणार्या संचालकांसारख्या राजरोसपणे फिरत असतात. अधिकार्यांच्या बदल्या, निवडणुकीचा प्रचार, नेत्यांची वैयक्तिक कामांसाठीच रस्त्यांंवर दिसणार्या कार्यकर्त्यांप्रमाणे केवळ पावसाळ्यातच डबक्यांमध्ये बेडकं दिसत. त्यांची डबकीही ठरलेली होती. पण आजकाल डबक्यांमध्ये माणसं पडतात म्हणून असेल, किंवा डबक्यांंची संख्या वाढल्यामुळे असेल कदाचित बेडकंसुद्धा इकडून तिकडे उड्या मारताना दिसतात. त्यांचे अस्तित्व केव्हाही, कुठेही दिसते. पाणी कुठे तुंबले, रस्त्यांच्या खड्डे पडलेच नाहीत, असे म्हणणार्या नेत्यांच्या आवाजातही ही डरांव - डरांव ऐकू येते.
एखादा उंदीर घरात घुसायचा, चोरून आपलं बिळ तयार करायचा. मिळेल ते कुरतडायचा आणि गुपचूप लपून बसायचा. आपल्या कार्यकाळात भ्रष्टाचाराचा आरोप झालेल्या लोकप्रतिनिधीप्रमाणे अगदी निरागस चेहरा करून बिळातून हळूच बाहेर डोकवून परिस्थितीचा आदमास घ्यायचा. आजचे उंदीर मात्र राजरोसपणे घरातून फिरतात. जणू त्यांनी काही कुरतडलेच नाही, असा त्यांचा आविर्भाव असतो. कुठेही पावसाचे पाणी तुंबले नाही, असा दावा करणार्या महापौरांसारखे ते निर्विकारपणे आणि मुजोर चेहर्याने फिरताना दिसतात.
त्यातच मराठी माणूस म्हणजे खेकडा, हे आपण ऐकत आलोय. एकमेकांचे पाय ओढणारे खेकडे सध्या पावसाळ्यात आमच्यासारख्या सगळ्या खवय्यांचा आवडीचा विषय. टोपल्यात असतानाही एकमेकांचे पाय ओढण्याच्या स्वभावामुळे हे खेकडे थेट चमचमीत रस्स्यात जात नाहीत, तोपर्यंत भानावरच येत नाहीत. त्यानंतर मात्र उशीर झालेला असतो. सध्याच्या सरकारच्याही लक्षात आता ही बाब आली आहे, हे अभिनंदनीयच म्हणावे लागेल. ’मराठी माणसा’ची काळजी, कळवळा असल्यामुळे मंत्री तानाजी सावंतांसारख्यांना खेकड्यांच्या मानसिकतेचा चांगलाच अभ्यास झालेला असावा. मराठी माणसाने एकमेकांचे खेकड्यासारखे पाय ओढू नये, म्हणून मराठी माणसांसाठी झटणार्या पक्षाच्या कंत्राटदार आमदाराने बांधलेल्या धरणाच्या पाठीशी उभे राहण्याचे ’औदार्य’ सावंतांनी त्या काळात दाखविले असावे. आता ते धरण वाहून गेल्यामुळे त्यांनी पुन्हा हेच औदार्य दाखविण्याची हिंमत दाखविली आणि थेट खेकड्यांवरच धरणफुटीचा आरोेप केला. खेकड्यांमुळेच चिपळुणचे तिवरे धरण फुुटलेे हा त्यांचा अभ्यासातून आलेला निष्कर्ष पटण्यासारखा आहे. कारण पूर्वी खेकडे एकमेकांचे पाय ओढत, पण कधी त्यांनी भिंती पोखरल्या नाहीत. महाराष्ट्रातील एकही जलदुर्ग गेल्या साडेतीनशे वर्षात कधीच खेकड्यांनी पोखरला असं ऐकीवात आलं नाही. पण आता कदाचित हे खेकडे एकमेकांना साथ देत असावेत. त्या खेकड्यांनीही आता ’मराठी बाणा’ सोडून एकमेकांना साथ देत भक्कम असलेल्या धरणांच्या भिंती भ्रष्टाचाराच्या नांग्यांनी पोेखरण्याचा उद्योग सुरु केला असावा, हे सावंतांशिवाय अधिकारवाणीने कोण सांगेल?
0 Response to "हे खेकडो कोण?"
टिप्पणी पोस्ट करा