-->
लांडगा आला रे आला

लांडगा आला रे आला

vishalraje.com

गाढ झोपलेल्या गावाला त्रास देण्यासाठी लांडगा आल्याची हाकाटी ऐकून - ऐकून लोकांचे कान विटले. दिवसभर लांडग्याचा धाक दाखवायचा, लांडगा आला तर मेंढरं उचलून नेईल, खाऊन टाकेल... असं करेल अन् तसं करेल... याच गप्पा ऐकून लोकांना कंटाळा येतोच की. कितीवेळ किती गोष्टींची भीती मनात घर करून राहू शकते? एकदा - दोनदा - तिनदा लांडगा आला रे आला म्हटलं की लोक सैरभैर होतील, मदतीला धावतील, पळापळ करतील, आवरासावर करतील, लाठ्या - काठ्या काढतील... पण किती वेळा? दर साडेचार वर्षांनी (हिशेबासाठी सांगायचं म्हणजे बरोब्बर निवडणुकीच्या आधी) असा लांडगा आल्याची हाकाटी होत असेल तर... तर काय ’तुम्हाला शुभेच्छा’ एवढं म्हणून विषय सोडून गर्दी निघून जाते. 
डोंगरावर बसल्या - बसल्या कंटाळलेल्या आाणि कोणीच लक्ष देईनासे झालेल्या एकाने गावकर्‍यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी लांडगा आला रे आला... अशी हाकाटी केली आणि अख्खा गाव हादरला तो वीस वर्षांपूर्वी (संदर्भासाठी म्हणायचे म्हणजे युती सरकारच्या काळात). लोक लक्ष देत नाहीत, ही सल फार मोठी असते बघा. (जरा केस पिकले, दाढीची खुटं पांढरी झाली आणि तरण्या पोरींनी पाहुन न पाहिल्यासारखं केलं की काय हालत होते, हे आठवा जरा. किंवा पाणीपुरीच्या गाडीवर झालेल्या गर्दीत नुसतीच प्लेट हातात धरुन उभं राहावं लागलं आणि पाणीपुरी देणार्‍यानं दुर्लक्ष केलं की कशी सटकते?) तसंच त्याचं झालं असेल. लोकांची लगबग झाली, पळापळ झाली, गर्दी गोळा झाली. काहीजणांनी हाकाटी करणार्‍याच्या हेतुवर जरा भीत भीत शंका व्यक्त केली. काहींनी ’वाकडतोंड्या’ म्हणून हेटाळणी केली. त्यानेही जोरदार उत्तर दिलं, अगदी सैनिकी बाण्यानं. मग लोकांचा विश्‍वास बसला... लांडगा आल्याच्या हाकाटीवर. काही काळाने कळपातील एक त्यातल्या त्यात निरुपद्रवी, कोवळे, पोकळ मेंढरू लांडग्याने नेलं आणि लांडगा परत गेला म्हणून त्यानेच निरोप धाडला. गर्दीने निःश्‍वास सोडला. जाऊ दे मरतुकडं एकच मेंढरू कामी आलं, बाकीची गब्बर -जब्बर मेंढरं बचावल्याचं समाधान व्यक्त झालंं. सगळीकडे सामसूम असताना पुन्हा अनेकदा हाकाटी झाली. लोकांनाही त्याच्या जागरुकतेचं कौतुक वाटू लागलं. लहान - मोठी पण कमी महत्वाची मेंढरं गायब होऊ लागली. मग पंचक्रोशीतील सगळ्याच गावांंना लांडग्याचा धोका आहे, त्यांनी सगळ्यांनी सोबत यावं म्हणून त्यानेे रान माजवलंं. 
अनेक गावातील ’त्याच्यासारखे’ निधड्या छातीचे, लोकांसाठी काहीही करण्यास तयार असलेल्यांंची फौजच मग डोंगरावर उभी राहिली, लांडग्यापासून सर्वसामान्यांंचा बचाव करण्यासाठी. पण त्याच दरम्यान, लांडग्यांंची संंख्या वाढली, (हे त्यानंच सांगीतलं) पण गायब होणार्‍या मेंढरांची संख्या मात्र कमी - कमी होत होती. मात्र काही दिवसांतच सर्वसामान्यांंचा बचाव करण्यासाठी आलेल्या आणि फाटक्या असलेल्या लोकांकडेच मेंढरांचे कळप तयार झाले होते. अर्थात लांडग्यांंपासून वाचविण्यासाठी आलेल्यांना लोक स्वेच्छेने मेंढरंं देत होती. त्याच्याकडेही मोठा कळप तयार झाला... नव्याने तयार झालेले मेंढरांचे कळप घेऊन त्याच्या मदतीला आलेले भाडोत्री सगळे लढवय्ये आपापल्या गावी परतले. आणि हा पुन्हा एकटाच डोंगरावर लांडग्याकडे लक्ष लावून बसला. त्या डोंगरावरच आता एक पंचतारांंकित मंदिर आहे, एसी खोल्या आहेत, गाड्या - घोड्या आहेत, दिमतीला माणसं आहेत... (असं म्हणतात). पण लोकांच्या मनातील लांडग्याचं भय थोडं निघून गेलं आहे... आत्ता - आत्ता म्हणजे चारच दिवसांपूर्वी त्याने पुन्हा हाकाटी केलीए... लांडगा आला रे आला... पण लोकं निवांत आहेत. कोणीच दखल घेत नाहीए... पळापळ, लगबग काहीच नाहीए... कुणीतरी म्हणतंय - डोंगरापल्याड लांडगा नव्हताच कधी. सत्ता सुंदरीनं दारात पाणी भरावं, प्रसिद्धीचा हव्यास पुरा व्हावा, दिमतीला असलेल्यांचे संसार चालावे आणि मदतीसाठी आलेल्यांंकडे मेंढरांंचेे स्वतंत्र कळप तयार व्हावेे, म्हणून त्यानेच पाळलं होतं म्हणतात लबाड लांडग्याचंं एक पिल्लू. 

0 Response to "लांडगा आला रे आला"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel