अंधारातील भेट
मंद, कुंद प्रकाश म्हणावा की अंधार अशा वातावरणातील गाठीभेटींचे तपशील कधीच कुठेही बाहेर येत नाहीत. ते येऊ नयेत यासाठीच अशा ’भेटी’ होतात आणि नवनव्या नात्यांच्या ’गाठी’ पडतात. अशा भेटींना बंदव्दार, वैयक्तिक भेट वगैरे म्हणण्याची प्रथा राजकीय वर्तुळात आहे. त्या भेटीतील कोणीतरी फुटल्याशिवाय अशा भेटींच्या चर्चांचे पेव फुटत नाही. (भिंतींना कान -बिन सबकुछ झूठ) अशा भेटी अनेकदा फार - फार उपयोगाच्या आणि फायद्याच्याही असतात.
कॉलेजात तिला/त्याला ’मन की बात’ सांगायची असेल तर असे वातावरण एकदम लाभदायक. हो म्हटलं तर किंवा सॅण्डलचा नंबर सांगीतला तरीही बाहेर कळतंय थोडंच कोेणाला? समजा एखाद्याला सार्वजनिक ठिकाणी काही बोेलण्यास भीड पडत असेल तर अशा एकांतात त्याला काहीही ऐकवता येऊ शकतेे. तुमची शारिरीक कुवत चांगली असली तर दोन आवाज कानाखाली काढून त्याच्या आई - बहिणीची (आदरार्थी) आठवण काढणेही उपयुक्त ठरते. किंवा शारिरीक कुवत कमी पडली तर समोरच्याकडूनही दोन आवाज काढले जाऊ शकतात. (या कानाचं त्या कानालाही कळत नाही हा वाक्प्रचार अशाच प्रकारातून आला असावा) एखादा अधिकारी पैसे मागतोय (म्हणजे ते पैसे मागतातच), पैसे देऊनही काम होत नाहीए, विनाकारण खुसपटं काढून काम थांबलंय, कायद्यात न बसणारंं काम करून घ्यायचंय तर अशी बंदव्दार ठिकाणं कामी येतात. आत काय झालं ते बाहेर बसलेल्या शिपुर्ड्यालाही कळत नाही. उर्मट - उध्दटपणे अधिकार्यांना जाहीररित्या ऐकविणारे नेते मोठ - मोठ्या अधिकार्यांच्या पाया पडले काय किंवा माजुरर्डे अधिकारी नेत्यांच्या पाया पडले काय... बाहेर काहीच कळत नाही. एकावर किती शून्य लागले आणि किती शून्य एका भेटीत कमी झाले हेसुुद्धा अशा एकांतातील, अंधारातील भेटींचे यशापश असतं.
पण अशा बंद दारांआड काय झालं हे पैजेवर सांगणारेही खूपजण असतात. तसं बंद दाराआडचं सांगणार्यांपेक्षाही दुसर्यांच्या बेडरुममध्ये काय आहे, हे सांगणार्यांचं खरंच कौतुक आहे. (असे कौतुकास्पद नमुने निवडणुकीच्या वातावरणात तयार झालेले दिसू लागलेत.) अशांच्या कचाट्यातून कोणीच सुटू शकत नाही. अगदी माजी संरक्षण मंत्री किंवा मुख्यमंत्रीही. पर्रिकरांच्या बेडरुममध्ये राफेलची कागदपत्रं आहेत, हा शोधसुद्धा अशाच एका (दिव्यदृष्टी प्राप्त झालेल्या) नेत्याचा. विरोधी पक्षात असलं की दिव्य दृष्टी लवकर प्राप्त होत असावी. गोष्टींमध्ये नाही का, दानव - असुरांंना देव पट्कन प्रसन्न होत असे. (सामान्य माणसं बसली बिचारी धावा करत.) म्हणजे तुम्हाला दिव्य दृष्टी प्राप्त झाली तर तुम्ही असूर किंवा दानव असं सत्ताधारी पक्षाचे लोक म्हणू शकतात. असो. तर एका युवा (?) नेत्याने ही दृष्टी (अगदीच बालवयात) मिळविली, आणि बिच्चारे पर्रिकर बेडरुमच्या साफसफाईला लागले असावेत. त्यातच या नेत्याने चक्क समोेरच्या व्यक्तीच्या मनातील जाणून घेण्याचीही शक्ती प्राप्त केली असावी. (तशी शक्ती त्यांंना मिळालीच आहे, त्यांची परंपरा, त्यांचा त्याग, त्यांची बुद्धीमत्ता वगैरे - वगैरे पाहून लाकुडतोड्याला मिळालेल्या तिन्ही कुर्हाडींप्रमाणे त्यांना दिव्य दृष्टीसह दिव्य श्रवणशक्ती आणि दिव्य कल्पनाशक्ती लाभली असावी. असो.) पाच मिनिटांच्या भेटीतच पर्रिकरांच्या मनातील विचार आमच्या या भविष्यातील दिव्य नेत्याच्या कानात घुमले. अंबानीचा फायदा, प्रधानसेवकाची भीती, बेडरुममधील फायली, राफेल - राफेल... हे सगळं त्यांना दिव्य श्रवणशक्तीनं कळलंं.
एकांतातील बैठकीत पाच मिनिटांत केवळ एकमेकांची वास्त-पुस्त झाली. गोव्यात कुठले मासे हल्ली चांगले मिळतील, यावर एखादी विचारणा झाली असेल. पण ही दिव्य श्रवणशक्ती काही केल्या गप्प बसू देईना. मग बंद दाराआड झालेल्या चर्चेला सार्वजनिक करणं देशहितासाठी आवश्यकच होतं. ....फक्त.... पर्रिकरांनी ’मन की बात’ सांगीतली, हे म्हणणं या नेत्याचं थोडं चुकलंय. पर्रिकरांच्या मनात असे विचार आले होते, हे सांगीतलं असतं, तर आमच्यासारख्या सर्वसामान्यांचा लगेच विश्वास बसला असता की राव.



0 Response to "अंधारातील भेट "
टिप्पणी पोस्ट करा