-->
व्हिडू मोडला...

व्हिडू मोडला...

मांगच्या गल्लीतला बाल्या सत्तीच्या लगनात लई म्हणजे लईच नाचून राह्यला व्हाता. त्याचा हा नाच पाहून सत्तीच्या बापालेच नाही तं तिच्या अख्क्या खानदानासकट तिच्या होनार्‍या नवर्‍याले बी भलकसंच होऊन राह्यलं. सत्तीचं लगन एकडाव मोडलं का आपल्या शेंबड्या बाल्याच्या गयात तिले बांधाचं तिच्या मावशीनं सपनं पाह्येल होतंं. तिलेबी बाल्याचा हा जांगळबुत्ता काही ध्यानात ध्यानात येऊन नव्हता राह्यला. 
आता हे सत्ती म्हनजे आमच्या गावातली भलतीच चवचाल पोेट्टी. कही कोनाच्या संगट फिर्‍याले जायची तं कही कोनाला डोया मारायची. एखाद्यांले हात दाखोला की दुसर्‍याले जिभ दाखोत खि - खि करत दात काढून धूम पऊन जायाची. गावच्या गरमपंचायतीची सत्ता कशी सार्‍याईले हुल देते, तसं तिचं होतं. या पोट्टीचं खरं नाव काही कोनाले माहित नाही. पण पुर्‍या गावाले नांदी लावते आन् हाती कायी सापळत नाही म्हून तिले सारे सत्ती म्हनत. ज्याच्या संगट बोल्ली तो तं राज्या निरा तिच्याच नांदी लागत होता. अन् ज्याच्या संगट बोल्ली नायी, तो तिले ’चालू हाय सायची’ म्हनून शादोत होता. त्या पोट्टीचे नखरेबी लय खतराच. तिचं ते एल्हावनं, चालनं निरानाम हिरविनच ती. तिचं लगन धरलं तालुक्याच्या एका मोठ्या शेतकर्‍याच्या पोरासंग. शेतकरी कोरडवाहूच होता पन पोरगं चार बुकं शिकलं होतं. मांगच्या 70 वरशात त्या शेतकर्‍याचं  वावर निरा उलाल होएल होतं अन् सरत्या हंगामात असं कायी बेज्या पिक आलं की त्यानं पोट्ट्याचं लगन पुर्‍या तालुक्याले पागल करनार्‍या सत्तीशीच धरलं. 
सत्तीचं लगन ठरलं अशी खबर कानोकान तालुक्यात फैलली. कोनी म्हने हे लगन कायी होत नसते. कोनी म्हने झालं तं त्याइचा दोन दिवसात वांधा पडीन. कोनी म्हने सत्तीशी लगन लाव्याची त्या शेतकर्‍याची औकातच नाई. तं कोनी म्हने मांगच्या हंगामात पिक आलं म्हनून त्या शेतकर्‍याच्या आन् त्याच्या पोट्ट्याच्या मनात गुलगुले फुटून राह्यले, पन यंदा कायी जमत नाई त्याहिचं. गावागावात पो÷ट्टे सत्तीच्या नावानं गया काढून राह्यले होते. पोट्ट्या थोड्या खुष होत्या. काऊन का सत्तीचं लगन झालं की आपल्याकडेबी पाह्यले गावातल्या पोट्ट्याईले फुरसत भेटन, असं त्याईले वाटून राह्यलं. पत्रिका छापून आल्या, वाटप पुरं झालं, आचारी ठरोला, पंगतीले शेव - बुंदी अन् लुंजी पायजे म्हणजे पायजे असा ईवाई - जवायाचा हट्ट पुरा झाला. लग्नाची दिस उजाळला, वरात निंगाली, नवरदेव आन् त्याचे फुल्ल पच्चिस दोस्त समोर, नवरदेवाच्या जवायाले नाचा नं बाप्पू म्हनून लायन्या सायीचा आग्रह सुरू होता. म्हतार्‍या - कोतार्‍या नटून - थटून होत्या. 
वेशीवर वरात आली अन् बाल्यानंं नागीन डान्सवर ताल धरला. नवरदेवाची बहीन बालीच्या लायन्या बालीच्या नवर्‍याच्या मावशीचा देर म्हणजे नवरदेवाचा दूरचा काका तोंडात रुमालाचं एक टोक अन् दुसरं टोक दोन्ही हातांनी धरुन नागोबासमोर वाजवत्येत तशी बिन वाजवून राह्यला होता, अन् बाल्या जोेर - जोरात घुमू राह्यला होता. बॅण्ड वाल्याईले जोर चढला. लोकाईले वाटलं हा नवरदेवाचा लयच जवळचा दोस्ती अशीन. तं काहींना वाटलं तो बीन वाजोनार्‍या काकाच्या सोयर्‍याचा कोनी अशीन. सर्‍या इकडे अंदाज - अंदाज फक्त अंदाज. बाल्याचा अंदाज काही कोनाले लागल न्होता. घामाघूम झालेला बाल्या अगोदर टोंगळ्यावर मंग, पाठीवर थोळ्या वेळानं पोटावर झोपून नागिन डान्स करत होता. सारे व्हिडीओ काढनारे, फोटू काढनारे बाल्याच्या नागीन डान्सचं शुटींग करून राह्यले होते. वरात ठायकेच उभी राह्यली. तिकळे सत्तीच्या माय - बापाले कायजी होती, नवरदेव काऊन पोहचला नशीन अजून. शेवटी लय झालं म्हनून सत्तीचा बाप चार - पाच मानसं घेऊन वेशीपर्यंत गेला. तठी पायते तं या बाल्याच्या नागिन डान्सचं व्हिडीओ शुटींग चालू अन् वरात उभीच. च्या मायला, असं दातओठ खात कचकावून एक शिवी देत सत्तीचा बाप वरातीच्या गर्दीत घुसला, अन् त्यानं बाल्याच्या समोर क्यामेरा धरलेल्याले भलकशीच गचांडी देल्ली. तो व्हिडीओ क्यामेरा खाली पडल्ला अन् खळ्ळकन् फुटला... तस्सा बाल्याचा डान्स थांबला... गर्दीतून कोनीतरी बोंबल्ला - बाल्याचा व्हिडू मोडला... आता खरंच सत्तीचं लगन होते का वरात पोहचली नाई म्हनून त्ये तशीच राह्यते हेच पाह्यचं आहे. सत्तीच्या बुढ्यानं खरंच व्हिडू मोडला का बाल्यानं नवरदेवाशी असलेली म्हना, नाईतर नसलेली म्हना दुश्मनी काढली? सत्तीच्या बापाचा अन् बाल्याचा दांगळो पाहून वर्‍हाडी मंडळी पऊन गेली का, हे काही अजून समजून नाई राह्यलं. 

0 Response to "व्हिडू मोडला..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel