देवाचिये व्दारी किती मग्रुरी...
माहुरला रेणुकेच्या दर्शनासाठी आम्ही अगदी लहानपणापासून जातो. गेल्या काही वर्षांत त्याठिकाणी देेवीच्या गाभार्याशी बसलेल्या पुजार्यांनी लूट चालवली आहे. पैसे पेटीत टाकणार्यांना वेगळी वागणूक आणि पुजार्यासमोरच्या थाळीत टाकणार्याला वेगळी वागणूक. हे माझ्या नजरेतून सुटले नाही. त्यामुळे मी आता केव्हाही माहुरला मंदिरात गेलो की शंभराची नोट हातात समोर बसलेल्या पुजार्याला दिसेल अशा पद्धतीने ठेवतोे. मग काय, गाभार्यासमोर कितीही गर्दी असू दे, आमचे दर्शन निवांंत होते. अर्थात आम्ही आमच्याच कुलदैवतेचेे दर्शन तिच्यासमोर बसलेल्या पुजाऱ्याकडून विकत घेतो, आजकाल. गेल्या महिन्यात तुळजापूरच्या भवानी मंदिरातही असाच काहीसा अनुभव आला. पावलोपावली केवळ दलालांचे साम्राज्य. मंदिराच्या रांगेत उभे राहून तुळजाईचे दर्शन घडवून देण्याचे वेगवेगळे दर ठरलेेले. अत्यंत निलाजरेपणाने देवाच्या दाराशी भडवेगिरी करणारे अनेकजण इथे दिसतात. मंदिराच्या आतल्या पुजार्यांंकडून लूट वेगळीच, पण डोक्यावर गंध लावून गिर्हाईक हुडकत फिरणारे मगृर दलाल वेगळे. गाडीचे पार्किंग, देवीचे लवकर दर्शन करण्यासाठीचे हजार रुपयांपासून सुरू झालेले त्या दलालाचे दर थेट दोनशे रुपयांपयर्रत आले. जिन्स टीशर्ट घातलेल्या त्या दलालाने मंदिरात येताना लगेच खिशात ठेवलेले धोतर जिन्सच्या वरुनच गुंडाळले आणि आमचा मार्गदर्शक झाला. आळंदीला बाहेर प्रसाद, फुलं विकणार्यांकडून लूट. ज्ञानोबा माऊलीशी काहीच देणेघेणे नसलेल्यांची तिथे लूटखोरी. तिकडे दक्षिणेत तर दर्शनाची रांगच तुमच्या आर्थिक कुवतीनुसार ठरलेली... फक्त आणि फक्त शेगावचे गजानन महाराज मंदिर सोडले तर प्रत्येक ठिकाणी कोणत्यातरी पद्धतीने भाविकांची लूट ठरलेलीच.
आज अचानक हा विषय आठवण्याचे कारण तसेच घडले... समस्त वैष्णवांचा मेळा ज्या पांडुरंगाच्या चरणी समर्पित होतो, त्या सावळ्या पांडुरंगाच्या समोरच एका भाविकाला एका बडव्याने मारहाण केली. काय तर म्हणे त्या भक्ताने पांडुरंगाच्या गळ्यात हार घातला. एवढ्या क्षुल्लक कारणावरुन सदा सर्वकाळ देवाच्या चरणाशी बसलेेल्या त्या बडव्याचा संताप अनावर झाला आणि त्याने थेट भक्ताला झोडपून काढले.
ज्या ठिकाणी क्रोध, मत्सर, ईर्ष्या आणि सगळ्याच भावना गळून पडतात, ज्याठिकाणी केवळ भाव उरतो आणि तोसुद्धा समर्पणाचा, आत्मशोध पूर्ण झाल्यासारखं वाटतं, मन शांत - शांत होतं आणि डोळ्यातून आपोआप अश्रू ओघळू लागतात... असा अनुभव येतो तो देवाच्या दाराशी, त्याच्या चरणाशी. पण अशा ठिकाणी म्हणजे साक्षात देवाच्या चरणाशी दुकानदारी थाटून बसलेले पुजारी, बडवे पाहिले की तळपायाची आग मस्तकात जाते. लाखो लोक ज्याठिकाणी आपल्यातील स्वत्व विसरून समर्पण भावाने येतात, नतमस्तक होतात, त्याच देवाच्या समोर दुकानदारी थाटून बसलेले हे टगे दिसले की प्रचंड संताप होतो.
ज्या देवाच्या दाराते तुम्ही - आम्ही विनम्र होतो, आपला अहं विसरतो, अशा ठिकाणी दिवसरात्र राहणारे हे पुजारी, बडवे अधिकाधिक मग्रूर होत जातात. आजकाल प्रत्येक मंदिरात केव्हाही जा गर्दी वाढलेली. लोक भक्तीने नव्हे तर भीतीने येतात. आपण ओरबाडून कमावलेले टिकावे म्हणून, ओरबाडायची अजून संधी मिळावी म्हणून, कोणी आपले ओरबाडून घेऊ नये म्हणून अशी वेगवेगळ्या प्रकारची भीती या रांगांमध्ये असते. या भीतीचा हा खरा व्यापार मंदिरांमध्ये सुरू आहे. यातून मिळणारा पैसा या लोकांना मुजोर बनवतो आहे. यात केवळ ब्राह्मण नाहीत, सगळ्याच जातीनुसार जसे देव वाटून घेतले आहेत तसेच त्याच्या पुजेचे अधिकारही वाटून घेतले गेले आहेत. त्यामुळे त्या सगळ्याच जातीचे पुजारी असेच मग्रुर झालेले आहेत. केवळ हे पुजारीच माजले असे नाही तर मंदिरांच्या बाहेर अतिक्रमणात दुकाने लावणारेही तसेच मस्तवाल असतात. हजार किलोमिटरवरुन आलेल्या भक्ताला त्यांंच्याशी डोकं लावायचा वेळही नसतो आणि त्याची इच्छाही नसते. त्यामुळे मग ओटीचे सामान असेल नाहीतर खंडोबावर उधळायची हळद असेल, अतिशय गोड, चिकट पेढे असतील नाहीतर अगदी सुकलेले हार असतील, ते घेतलेच जातात. देवावर टाकून पुन्हा विक्रीसाठी येतात. हे दुष्टचक्र आहे. यात, आपण भाविक नव्हे तर ग्राहक ठरतो आणि म्हणून आपली पिळवणूक होते, लूट होते.
या सगळ्या प्रकाराला केवळ शेगावच्या गजानन महाराज मंदिराचा अपवाद आहे. कुठेही माजोरी नाही, मग्रुरी नाही. पदोपदी असलेले सेवाधारीसुद्धा अतिशय विनम्र. तुम्ही कोणीही असा त्या सेवाधारींसाठी ’माऊली’च असता. स्वच्छता, टापटीप पण तरीही बडेजाव नाही. तुमच्या खिशाकडे तिथे कुत्रंही ढुंकून पाहत नाही. शेगाव संस्थानकडूनच उलट येणार्या भाविकांसाठी अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या. त्यामुळे अशा लुटमारीच्या ठिकाणी गेलं की सतत गजानन महाराज संस्थानशी तिथली तुलना होत रहाते. जे शेगावला शक्य आहे, ते इतर ठिकाणी का नाही? हा अनुत्तरीत प्रश्न मग मनात येतो.



0 Response to "देवाचिये व्दारी किती मग्रुरी..."
टिप्पणी पोस्ट करा