हतबल पितामह
आता पुन्हा रणात उतरणार नाही, ही घोषणा त्याने आज नव्यानेे केली आणि काळे कभिन्न ढग दाटून आलेले, आजुबाजुच्या प्रचंड डोंगरांना धगधगत्या वणव्याने कवेत घेतले असल्याने आधीपासूनच खिन्न, उदासवाणे वाटणारे वातावरण अधिकच उदास झाले. कोणे एकेकाळी आपल्या भात्यातील एकसे एक शरांनी शत्रुपक्षाची गाळण उडविणारा, आपण म्हणजेच यश आणि आपण म्हणजेच विजयश्री हा रणभूमितील पामरांचा विश्वास सार्थ ठरविणारा पराक्रमी योद्धा... एकाच म्यानात दोन नव्हे तर अनेकानेक तलवारी ठेवण्याची आणि त्या समर्थपणे वेळ - काळ पाहून काढण्याची खास कला अवगत असलेला वीर... ज्याच्या तरवारींचीच नव्हे तर म्यानांचीही भीती प्रतिपक्षाने बाळगावी, म्यानातून कोणती तलवार केव्हा बाहेर येईल याचा अंदाज दस्तुरखुद्द बाहेर येईतो तरवारींंनाही नसावा इतका कुशल, वाक्बगार, चपळ लढवय्या... प्रतिपक्षाच्या सेनापतींनी ज्याला तेल लावलेला पैलवान म्हणून गौरवावे, मैद्याचं पोतं म्हणून हिणवावे... कशाचाच त्याच्या सत्तेची कवच कुंडलं असलेल्या मनावर कधीच परिणाम झाला नाही. तोच वीर, योद्धा, लवय्या... आज सह्याद्रीच्या कुशीत खिन्न मनाने एकेक पाऊल टाकत शतपावली करीत होता. आता पुन्हा रणात उतरणार नाही, ही घोषणा त्याने नुकतीच नव्याने केली. थेट रणातून माघार घेतली तरीही रणांगण गाजवून सोडणारे त्याचे अनेक उत्तराधिकारी आहेत की. त्यातील कोण रण गाजवेल, याचही अंदाज त्याला आहे. त्यामुळे त्याची पावले ठामपणे पडत आहेत, आजही. पण त्या पावलांची दिशा कधीच कोणाला कळली नाही, तशीच ती आज अशा खिन्न वातावरणातही कळत नाहीये.
सत्ययुगात जेे झाले, त्रेता युगात जे घडले तेच आज मोदी युगात घडतेय का? असा प्रश्न साक्षात इतिहासाला पडलाय. सत्तेच्या पाशांनी सगळे - सगळे संबंध खिळखिळे होताहेत की सत्तेचे पाश विजेत्याच्या प्रतिमेला आवळू पाहताहेत. या पाशांनी कायम सोबत केली, आपल्याला. अगदी ’वसंता’च्या बहरातसुद्धा. या महाराज्यावरील नजर कधीच हटली नाही, इतक्या वर्षात. ऐन रणभूमित आपण विरोधात ठाकलो असतानाही प्रतिपक्षातील एका विजेत्या योद्ध्याने आपणच त्याचे सारथ्य केल्याची जाहीर कबुली दिली होती, प्रजाजनांना तेव्हा आश्चर्य वाटले. पण आपण कधीच कुटुंब - कबिल्याचा विचार क्षणभरही दूर होऊ दिला नाही. अनेक सेनापती तयार झाले, प्राणपणाने लढणारे सैनिक तयार झाले पण कधीच आपल्या अढळस्थानाला धक्का लावण्याचे धारिष्ट्य कोेणाच्या ठायी निर्माण होणार नाही, याची आपण काळजी घेतली. धक्का लावण्याची शक्ती मिळवू पाहणार्या भल्याभल्यांना धक्क्याला लावले. अरेरे... पण आज हे अचानक असे का व्हावे??? त्याचे विचारचक्र क्षणभर थांबले.
आपल्याच जवळचे, अतिजवळचे सगळे तरुण नेतृत्वस्थानी बसवणे म्हणजेच नव्या नेतृत्वाला संधी देणे. सत्तेच्या पाशात गुंतून या महाराज्यातील अनेक कुटुंबांमध्ये उभी फूट पडली. अर्थात प्रजा म्हणते त्यात आपलाच हात असतो, असो. प्रजा काय काहीही म्हणते. परंतु, आज प्रथमच अर्धा शतकातील चौदा युद्धांतील यशानंतर एक पाऊल मागे घ्यावे लागलेय. नव्या सळसळत्या रक्ताने हट्टाने पेटून रणांगणात उतरण्याचा निर्णय खरा करून दाखवला. ’पार्थ’च आक्रमक झाला, कर्मण्येवाधिकारस्ते... त्याला मान्यच नसल्याच्या आविर्भावात त्याने मिळवूनच घेतले, त्याला हवे होते ते. पार्थाच्याही नशिबी कायम स्वकियांविरुद्धची लढाईच असते का? असे अनेक विचार त्याच्या घायाळ झालेल्या मनात घोळत होते. आणि अचानक त्याला आठवण झाली... त्या भिष्माची. तोसुद्धा होता पितामहच. स्वकीयांमुळे शरपंजरी पडलेला. प्रचंड आदर मिळकतीला असलेला पण आदेशातील धार गमावून बसलेला. अशा वेळी पितामहाने काय करावे? काय करावे... काहीच नाही... निवांत पडून राहावेे, शरपंजरी.



0 Response to "हतबल पितामह"
टिप्पणी पोस्ट करा