'दो मिनिट’ वाली पिढी
वर्षानुवर्षे, पिढ्यान् पिढ्या सतरंज्या उचलणारे, साहेबाच्या स्वागतासाठी खिशातील पैशांनी चपटी खरेदी करून मिरवणुकीत नाचणारे, हार - तुर्यांसाठी पैैसे गोळा करणारे आणि कोणत्याही परिस्थितीत साहेबावर नाराज न होणारे हाडाचे (म्हणजे ज्यांची केवळ हाडेच शिल्लक राहिली) कार्यकर्ते दिसणं जरा दुरापास्तच झालंय. नेत्याचा मुलगा नेता आणि कार्यकर्त्याचा मुलगा कार्यकर्ता हा न्याय लागू झाल्यापासून कार्यकर्तेही कमर्शिअल झाले. का होऊ नयेत? त्यांनीच का घरचं खाऊन मामूच्या बकर्या चारायच्या, लष्कराच्या भाकरी भाजायच्या? नेत्यांमध्ये होणारे बदल कार्यकर्त्यांमध्ये झिरपत असतात. थोडे उशीरा का होईना पण कार्यकर्त्यांमध्येही व्यावसायिक ज्ञान येऊ लागलंय. हे समाधानकारक नसलं तरी कार्यकर्त्यांच्या दृष्टीने पाहिल्यानंतर न्याय्य वाटणारं चित्र नक्कीच आहे. पण ज्यांच्या घरात अशा सतरंज्या उचलणार्या कार्यकर्त्यांच्या भरवशावर सत्ता पाणी भरतेय, त्यांनाही धीर नाही. त्यांनासुद्धा पुढच्या पिढीच्या हाती लवकरात लवकर सत्ता सोपविण्याची घाई झालीये. आणि पुढची पिढी तर गुडघ्याला बाशिंग बांधून सत्ताकारणात केव्हा उतरू याची वाटच पाहतेय. ’मम्मी भूक लगी है... बस दोे मिनिट’- असं म्हणून इन्स्टंट नुडल्स तयार व्हावेत आणि पोट भरावं, असं सत्तेची भूक लागलेल्या नेत्यांच्या दुसर्या पिढीला वाटतंय. म्हणूनच तर तातडीने सत्ता आपल्या ताटात वाढून घेण्याची जणू चढाओढ लागली आहे.
आव्हाडांनी म्हटलं तसं नेत्यांची मुलं पळविणारी टोळी सक्रीय झाली आहे वगैरे असं काही नसतं. तसं आव्हाडांना फारसं गांभीर्याने घ्यायचंही नसतं. कारण पाच - पंचविस वर्षांपूर्वीचे गणेश नाईक, छगन भूजबळ, धनंजय मुंडे, आनंद परांजपे अशा काहींचे नेतृत्व त्यावेळच्या नेत्यांनी गर्भारणीच्या कळा सोसून जन्माला घातलेलंं नाही. त्यावेळी ते ’पॉवरफूल’ होते, म्हणून त्यांच्या दुकानात गर्दी होती. आज भाजपचं दुकान चालताना दिसतंय, म्हणून तिथे गर्दी झाली. विखे पाटलांंना कोणत्याही परिस्थितीत सत्तेतून दूर राहायचं नाही, हे ठरलंय. मग त्यासाठी काहीही करण्याची तयारी ठेवावी, हा आजोबांचा कित्ता नातवाने गिरवला तर बिघडले कुठे?
राहिला विचार, संस्कार, वैचारिक ठेवण याचा मुद्दा तर तो दूर - दूरपर्यंत कुठेच दिसत नाही. नगरची जागा काँग्रेसला मिळाली तर काँगे्रसकडून लढू, राष्ट्रवादीला सुटली तर राष्ट्रवादीने तिकिट द्यावं, नाही देत तर भाजपमध्ये जातो... ही ’प्रवासी’ मानसिकता असते. त्यात विचाराचा संबंध कसा आला? आपण नाही का करत, एखाद्या बसमध्ये गर्दी असेल तर दुसरी पकडू, त्या बसला उशीर असेल तर तिसरी पकडू नाहीतर काळी - पकडून जाऊच... तोेच विचार सत्तेची भूक पोटात खवळली असली की होतो. तु नही और सही, और नही और सही... असे रोड रोमिओ राजकारणात येतात आणि सत्ता सुंदरीला छेडतात. कार्यकर्त्यांची गर्दी रस्त्यावरच्या बघ्यांसारखी मूकदर्शक बनून राहाते. सत्ता सुंदरीच्या छेडखानीच्या अशा घटना निवडणुकीच्या काळात जास्त प्रमाणात घडतात.
पण एक मान्य करावंच लागेल. पोरांची भल्या - भल्या नेत्यांच्या डोक्याला शॉट लावला आहे. पवार, विखे, मोहिते हे सगळे सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले नेते आपापल्या घरातील पोरांमुळे पार हादरून गेले. बरं अशी गोची झाली की आमच्या पोरांना मोदीने फूस लावली, असं म्हणायची सोय राहिली नाही. एखाद्या मख्खीचूस सावकाराच्या घरात दानशूर कर्ण जन्माला आल्यानंतर त्याला जे वाटत असेल, तो अनुभव सध्या हे कार्यकर्त्यांच्या जीवावर दिग्गज झालेले नेते घेत असावेत. पेरलंं महा - उगवलंं महा... अशी एक महाबिजच्या बियाण्यांची जाहीरात होती. अशावेळी तीच आठवते कारण जे पेरलं तेच उगवतं हा नियम काही फक्त शेतीतच नसतोे, तोे राजकारणालाही लागू होतोच नं.
--



0 Response to "'दो मिनिट’ वाली पिढी "
टिप्पणी पोस्ट करा