-->
आशा जगण्याची...

आशा जगण्याची...

पात्र - तीन
नावे - पहिला, दुसरा आणि तिसरा 
प्रसंगं - पहिल्यासाठी निवांत, दुसर्‍यासाठी अटीतटीचा 

(दोघे निवांत म्हणजे पहिला खाकी - हिरवट पॅन्ट शर्ट, डोक्यावर गोल चौकीदारासारखी टोपी आणि हातात दांडुकासदृष्य माईक घेऊन निवांत खुर्चीवर बसलेला. दुसरा अशा पद्धतीनेे उभा, की पहिला खुर्चीत थोडाजरी उचकटला तर पट्कन जाऊन त्या खुर्चीत बसण्याच्या तयारीत.  आणि तिसरा दोेघांच्याही समोर खाली फाटक्या सतरंजीवर बसलेला. तिघांमध्येही तावातावाने चर्चा सुरु असते. अर्थात पहिल्या दोघांमध्ये सुरु असलेली चर्चा तिसरा इमानेइतबारे ऐकतो आहे.)... अब आगे...
पहिला ः (उपकार केल्याच्या सुरात) अजुन काय पाहिजे तुम्हाला? प्रतिमा सुधारली. दिवसरात्र एक करून अख्खी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली. 17 - 18 तास काम करतोय. शेजार्‍याने अरे म्हटलं की त्याच्या घरात घुसून कानाखाली वाजवली. (वैतागून) अजुन करायचं काय? 
दुसरा ः (डोळा मिचकावून) पंधरा लाख कुठे गेले? (गालावर खळी पडते). एकाच खुर्चीवर बसून आहात आणि म्हणता काम करता? (पुन्हा डोळा मारतो). आमच्याकडे भंगार घ्यायला येणारा तंत्रज्ञानात एकदम एक्स्पर्ट आहे. कितीतरी जुने चार्जर, खेळणी तो दुरुस्त करतो पुन्हा विकतो. त्याला देण्याऐवजी तुम्ही विमानं बनविण्याचं कंत्राट तुमच्या गावाकडच्या मित्राला दिलं, हे खपवून घेणार नाही. (सदर्‍याच्या बाह्या सावरत पुन्हा एका डोळ्याची हालचाल).
तिसरा ः गप्पच. 
पहिला ः (ठामपणे) त्या कंत्राटाचं सोडून बोला. 
दुसरा ः (काहीतरी मोठ्ठं सापडल्याच्या आनंदात) असं कसं - आम्ही नाही सोडणार. खूप गंभीर प्रश्‍न आहे. (गालावर खळी पडण्याइतकं हसतो).
पहिला : (चेहर्‍यावरची रेषही हलू न देता) आम्ही लोकांना थेट सहा हज्जार रुपये देणार आहोत. दरवर्षी. (डोळ्यात पाणी आणून) लोकांचे हल पहावत नाहीत. 
तिसरा : (थोडं स्मित हास्य करून) (स्वगत) हे बरं होईल. 
दुसरा : (गोंधळात पडल्यासारखा चेहरा करून) सहा हजारात काय होईल. आमच्या जॅकेटचं एक बटणसुद्धा येत नाही तेवढ्यात किंवा इटलीतील पास्ताही मिळत नाही (जिभ चाऊन) म्हणजे तुमच्या जॅकेटचं बटण. एका दिवसाला फक्त 17 पैसे? 
तिसरा : (आशाळभुताप्रमाणे बघत)  (स्वगत) हा जरा जास्त देतो का पाहू.
पहिला : सहा हजार आम्ही देतोय. तुम्ही काय देत होतात? पाच वर्षासाठी तुमचे उमेदवार गुपचूप पाचशे रुपये देत होते. किती पैसे होतात एका दिवसाचे? आम्ही थेट देणार आहोत. 
तिसरा : (बोटावर हिशेब करतो)
पहिला : गॅस दिला, नव्या रंगीबेरंगी नोटा दिल्या. फुकट काय - काय देणं शक्य होतं ते सगळं दिलं. कंत्राटे सोडून सगळंच दिलं की यांना. (मोठा श्‍वास घेत छाती फुगवून) शिवाय देशभक्ती शिकवली, त्यापेक्षा काय मोठं आहे. 
दुसरा : देशभक्ती? (न कळल्यानं गोंधळून) तुम्ही असंच काहीबाही बोलून लोकांना भूलवता, आणि चोरांना साथ देता. (पहिल्याला वेडावत आणि तिसर्‍याकडे डोळा मिचकावून) तुम्हीच चोर आहात.
तिसरा : (खळखळून हसतो) हा.. हा.. हा..
दुसरा : (खूप जुनं म्हणजे चाळीसएक वर्षांपूर्वीचे काहीतरी आठवून) आम्ही सगळ्यांची गरीबी हटवून टाकू. तुम्ही वर्षाला सहा हजार द्याल, आम्ही महिन्याला देऊन टाकू. (तिसर्‍याकडे बघून डावा आणि पहिल्याकडे बघून उजवा डोळा मिचकावतो)
तिसरा : (सतरंजीला पडलेल्या छिद्रांशी चाळा करीत, पुन्हा बोटांवर हिशेब सुरू करतो.) आयला, गोंधळात टाकलं की राव. (स्वगत ः हा सहा हजार देतो म्हणतोय, पहिला हप्ता आलापण. दुसरा त्याच्या बारापट देतो म्हणतो पण डोळाही मारतोय... खरंच देईल?) 
पहिला : उगाच लोकांना खोटी आशा लावू नका. गेल्या सत्तर वर्षात काहीच केलं नाही तुम्ही. 
दुसरा : (तावातावाने शर्टच्या बाह्या वर करून) असं कसं म्हणता? आम्ही लोकांना जगणं शिकवलंय. त्यांच्या मनात आशा जागृत ठेवली आहे. दर पाच वर्षाने काहीतरी मिळेल या आशेने लोक दुःख विसरून पुन्हा ताजेतवाने होतात. कधीतरी आपली गरिबी दूर होईल, या आशेवर किमान दोन पिढ्या आम्ही जगवल्या आहेत. 
पहिला : (अचानक कोणी मिठी मारल्यानंतर गांगरून गेल्याप्रमाणे) याला जगवणं कसं म्हणता?
दुसरा : अहो, आशेवरच हे जग चालतं. गरिबी दूर होईल, ही आशा गरिबांना जगण्याचं बळ देते. गरिबी खरंच दूर झाली असती तर गरिबांना जगण्यासाठी आशाच राहिली नसती. आमच्यामुळे गरीबांच्या किमान दोन पिढ्या जगल्या आहेत, आता पुढल्या दोन पिढ्या जगाव्यात यासाठी आम्ही पुन्हा गरिबीविरुद्ध लढा सुरू केला आहे. (स्वतःवरच खुश होत स्वतःची पाठ थोपटून घेण्याच्या प्रयत्नात असताना अचानक सवयीप्रमाणे डोळा मिचकावतो.)
पहिला : अच्छा, गरिबांच्या केवळ दोनच पिढ्या तुम्ही आशेवर जगवल्या. आम्ही गरिबांच्या पुढल्या सात पिढ्या जगविण्याची तरतूद करू
तिसरा : (उत्सुकतेने थोडा सावरुन बसतो) कशा?
दुसरा : (प्रचंड निराश होत) कशा?
पहिला : पुढल्यावेळी पंधरा लाख देतो, नक्की... नक्की... नक्की...
तिसरा : बेशुद्ध...


0 Response to "आशा जगण्याची..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel