-->
गायब है वह...

गायब है वह...

बाजारात खेरदीसाठी जावे, भल्या मोठ्या पिशव्या भरून भाज्या - फळं घ्यावी. पैसे देण्यासाठी पाकीट काढावं आणि लक्षात यावं, पैसे गायब आहेत... चुलीवरची भाकरी आणि गावरान चिकन मिळेल असा बोर्ड पाहून पोटाची गत सत्ता गमावलेल्यांसारखी झालेली असताना थांबावे, ऑर्डर द्यावी रस्सा आणि पिसचा मस्तपैकी आघाडीसारखा योग जुळून यावा आणि पोटातील वंचित घटकांना शांत करायला जावे तर अखेरच्या घासाला लक्षात यावे, लेग पिस गायब आहे...लहान मुलासाठी मस्त दिसणारी आणि स्वस्त असणारी चड्डी विकत घ्यावी आणि घालताना त्या चड्डीचे दोन्ही पाय विलग करणारी शिवणच गायब आहे हे लक्षात यावे... लग्नाला आलेल्या आहेराचे पाकिट फोडावे आणि त्यात केवळ एक रुपयाचा कलदार निघावा, त्यातील नोट गायब असावी... तेव्हा कसा अष्टावधानी, चतुरस्र व्यक्तिमत्व, प्रकांड पंडित युवराज राहुल यांंच्यासारखाच चेहरा होईल, नाही?
तसाच चेहरा काल काहींचा झाला. तर कशी मज्जा आली, असं खिजवण्याच्या सुरात मनातल्या मनात विचारुन घेतलं. राफेलची कागदपत्र गायब झाली म्हटल्याबरोेबर अशाच प्रतिक्रिया आल्या. मित्रांंना साग्रसंगीत पार्टीसाठी बोलवावं आणि रात्री उशीरा बाटली खळ्कन फुटावी आणि नुसत्या कोल्ड्रींकवर पार्टी आटोपती घेण्याची वेळ यावी, अशी इच्छा अनेकांची आहे. म्हणजे तुमची पार्टी होऊच नये, किंवा गार्डनमध्ये बसून हनुमान चालीसा वाचणार्‍याने प्रेयसीशी गुलुगुलू गप्पा करणार्‍याला पोलिसाने पकडल्यानंतर मनोमन खुश होण्यासारखं आहे. (खरंतर त्याला प्रेयसी मिळाली नाही, मिळत नाही म्हणून याचा तळतळाट होत असतो, पण त्या तळतळाटाला संस्कृती, आजकालची पिढी वगैरे शब्द जोडून असुरी आनंदाला ’न्याय्य’ करण्याचा घाट घातला जातो.) असा शाप रोज जो उठेल तो सत्तासुंदरीशी गुजगोष्टी करणार्‍या मोदीशेठना देत आहे. मात्र, भर रस्त्यात प्रेयशीला बिनधास्त मिठी मारणार्‍यासारखं भाजप आणि सत्तेचं सुरु आहे. कोण काय म्हणेल, याकडे सपशेल दुलर्र्क्ष करीत एकमेकांच्या मिठीत पक्ष आणि सत्ता विसावलेले (सध्यातरी) दिसतंय. आणि सत्तासुंदरीपासून वंचित राहावे लागलेले बिच्चारे मनातल्या मनात तळमळतंय, मळमळतंय, जळजळतंय... असं म्हणत दिवसन् दिवस ढकलताहेत.
राफेलचे आरोप देशभक्तीच्या ज्वराने जळून खाक होत असताना अचानक कागदपत्रं गायब होण्याची भानगड उभी राहिली आणि आजन्म सत्ता हा अधिकार मानणार्‍या ज्या कोणाला सत्तेपासून लांब राहावे, त्यांच्या मनाला जरा आशा दिसू लागली. गायब आहे म्हणजे गडबड आहे, अशी हाकाटी सुरु झाली. तुमची मुलगी नाक्यावर अमक्या मुलासोबत दिसली, हे सांगण्यासाठी जसेे काही ’इच्छुक’ धाव घेतात तसाच, त्या धावणार्‍यांसारखा उत्साह काहींमध्ये संचारला. पण घरची मंडळी त्यावर विश्‍वास ठेवायला तयार नाही. एकदा का दोघांमध्ये बिनसलं की आपली लाइन क्लियर, असा विचार करून प्रयत्न करणार्‍या इच्छुकांच्या प्रयत्नांंना काही केल्या यश येेत नाहीये. राफेलचे कागद गायब झाले, हे नाकारणारे आमची मुलगी नाक्यावरच्या मवाल्यासोबत जाणारच नाही, अशी भूमिका घेणार्‍या पालकांप्रमाणेच भूमिका घेताना दिसताहेत. कोणाला सांगावं, कसं सांगावंं हा खरा प्रश्‍न आता ’गायब है वह’ म्हणणार्‍यांसमोर उभा ठाकला आहे. कितीही आदळ - आपट केली तरी काही केल्या सर्वसामान्य मतदार विश्‍वास ठेवायलाच तयार नाहीत. आमची पिंकी मवाल्यासोबत असेल तर तुमची चिंगी नाही का गंजाड्यासोबत पळून गेली होती... असा आक्रमक पवित्रा घेत राफेलवर थेट बोफोेर्स तोफ डागली जातेय.
एक अतिशय खासगी सांगू?... राफेलचा मुद्दा हा बायकोच्या गालावर बसलेल्या डासासारखा आहे. त्यावर उपाय नाहीच. कडकडून चावल्यानंतर उडाला की आपणच हवेत इकडे - तिकडे पहात म्हणायचे... कुठे आहे? कुठे आहे...? गायब है वह...

0 Response to "गायब है वह..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel