-->
हॅप्पी रिपब्लिक डे

हॅप्पी रिपब्लिक डे


आज मनसोक्त गाणं लावायचं, बेभान होऊन नाचायचं, जोर - जोरात गाड्यांचे हॉर्न वाजवून आणि झेंडे हाती घेऊन शहरभर अक्षरशः धुमाकूळ घालायचा, जमलंच तर मोटरसायकलचं सायलेन्सर काढून घरी ठेवायचं, चौकाचौकात गाड्यांना आडवं जाऊन लोकांच्या तोंडात मिठाई कोंबायची आणि प्लास्टीकचे झेंडे चिटकवायचे... घोषणा द्यायच्या. का? बायको माहेरी गेली म्हणून? परीक्षांना खूप अवधी आहे म्हणून? ड्राय डे आहे म्हणून? की कोण्या नेत्याचा वाढदिवस आहे म्हणून? काहीही काय विचारायचं... आज आपण स्वातंत्र्य झालो म्हणून. आँ!? नाही - नाही आज खर्‍या अर्थाने लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवली गेली म्हणून. ’आम्ही भारताचे लोक’ आपले राज्य चालविण्याचा अधिकार प्राप्त करू शकलो म्हणून... (यात आमचा सहभाग अजिबात शोधायचा नाही.) आज ’कोणता झेंडा घेऊ हाती’ हा प्रश्‍नच निकाली निघतो, कम्पलसरी तिरंगी झेंडाच हाती घ्यावा लागतो. दररोज दांड्यांंची क्षमता तपासूनच हाती घेतलेल्या झेंड्यांंच्या सुट्टीचा हा दिवस. कोणताच रंग वर्ज नसलेला हा दिवस. अचानक सगळीकडे आपलेच भाऊबंध फिरत असल्याचा आभास होण्याचा हा दिवस. मेरे देश की धरती... म्हणत अभिमानाने हिंडण्याचा हा दिवस. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा वर्धापनदिन म्हणून जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या घटकांनी सेलिब्रेट करण्याचा हा दिवस... मग बॉस, नाच - गाना तो बनता है.
रोजच्या कटकटीपासून म्हणजे ऑफीसपासून मुक्ती. सकाळी - सकाळी उठण्याचंं टेन्शन नाही. आता सरकारी लोकांना वर्षातून असं दोनच वेळा लवकर उठून तयार वगैरे व्हावं लागतं. (इतरवेळी त्यांंच्या उठण्याच्या आणि पोहचण्याच्या वेळांवर त्यांच्या ऑफीसचं कामकाज चालतं.) त्यामुळे त्यांनाही आज जबाबदारीची जाणीव होते, आणि आम्हा खासगीवाल्यांंना स्वातंत्र्याची अनुभूती. होय आम्ही सगळेच स्वतंत्र तर आहोत... कायद्याचा बडगा उगारणारी लाल तोंडाची माणसं आम्ही केव्हाच हाकलून लावली आहेत. पुन्हा कोणी असा प्रयत्न करेल तर त्यालाही हाकलून लावण्यासाठी आता तर आम्हाला लाठ्या बिठ्या खाण्याचंही कारण नाहीए, एक बटन दाबलं की आम्ही कोणालाही आम्ही हाकलून देऊ शकतो. (पण ते बटण दाबून असं कोणाला हुसकावून लावणं आम्हाला पटत नसल्यानं आम्ही मतदान करतच नाही हा भाग अलाहिदा.) आजच्या या स्वर्णाक्षरात लिहिलेल्या दिवसामुळेच आम्ही आमच्या जातीचा अभिमान बाळगू शकतो, पण त्याचबरोबर दुसर्‍यांच्या जातीला शिविगाळ करू शकतो. आमच्या धर्माचे पालन न करताही दुसऱ्याच्या धर्माची टिंगल करू शकतो. वाट्टेल त्या मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलनं हा तर मुलभूत हक्कच आम्हाला प्राप्त झालाए. या संविधानानेच आम्हाला स्वातंत्र्य दिलंय हे अजिबात विसरायचं नाही. हा देश काही कोणाच्या बापाचा नाही, हे आम्ही ठास्सून म्हणतो. (पण तो आमच्याही बापाचा नाही हे विसरायला होतं कधीकधी.) आणि त्यासाठी पाच वर्षातून एकदा मतदानाचं पवित्र कार्यही आमच्यातील काही उरकून येतात. हे थोडं आहे का?
आम्हाला मिळालेल्या एकाही हक्कावर आम्ही अजिबात गदा येऊ देणार नाही. सार्वजनिक स्वच्छता राखा, कचरा वर्गीकरण करा, प्लास्टीक वापरू नका, अतिक्रमणं करू नका, कायद्याचा आदर राखा, सर्वधर्मसमभाव ठेवा, गाय कापून खा किंवा नका खाऊ वगैरे फालतू गोष्टी सांगायच्या नाहीत. भ्रष्टाचार आम्ही कधीच करत नाही, तो आपण स्वतः सोडून इतर सर्वांचाच धंदा आहे. मतदान करण्यासाठी तर अजिबात दबाव आणायचा नाही. (राजकारणाच्या गटारगंगेशी आमचा संबंध नाही). आमचं मत आम्ही पाचशेला विकू नाहीतर पाच हजाराला, त्याबद्दल विनाकारण ’अमुल्य मत’ वगैरे सांगायचं काम नाही. आम्हाला वाट्टेल ते आम्ही करू, करतो. कारण आम्ही भारताचे लोकच या देशाचे मालक आहोत.
स्वातंत्र्याच्या पाठोपाठ म्हणे जबाबदारी येते. खरं वाटतं कधी -कधी. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्यदिन सेलिब्रेट करायचा म्हटल्यावर जबाबदारी वाढतेच की. आदल्या दिवशी कडक इस्त्रीचे पांढरे कपडे शोधून ठेवावे लागतात. शहरभर गाड्यांवर फिरायचे म्हणजे पेट्रोलच्या व्यवस्थेसह हॉर्नचा आवाज चेक करावा लागतोे. तिरंगा तर (त्या दिवशीची) आपली शान. मग मोठ्यात मोठा तिरंगा तयार करून घ्यायचा, कोेणता रंग वर कोणता खाली हे आठवून ठेवायचं. दांडापण कसा सगळ्यात उंच हवा (आपलीच हवा व्हायला हवी नं.) फेसबुकवर फोटो अपलोड करणं, व्हॉट्सअ‍ॅपवर तिरंगी डीपी ठेवणं, संविधानाच्या गौरवार्थ पोस्ट फॉरवर्ड करणंं यासाठी मगजमारी करावी लागते. शिवाय सकाळी एकदा शहरातून फेरी आटोपली की दिवसभर करायचं काय याचं प्लानिंग करून ठेवावं लागतं. नेमका ड्राय डे असल्यानं सगळी व्यवस्था आधीच करून ठेवावी लागते. कितीतरी कामं अशी जबाबदारीनं पार पाडावी लागतात. वर्षानुवर्ष अशी जबाबदारी जबाबदारीनं पार पाडल्यानंतर एखादवेळी वाटलं झिंग - झिंग - झिंगाटवर नाचावसं तर काय बिघडलं...? असो. हॅप्पी रिपब्लिक डे.
--

0 Response to "हॅप्पी रिपब्लिक डे"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel