मुक्ताई
परब्रह्मीं चित्त निरंतर धंदा | तया नाहीं कदा गर्भवास ॥ १ ॥
उपजोनी जनीं धन्य ते योनी | चित्त नारायणीं मुक्तलग ॥ २ ॥
अव्यक्ती पैं व्यक्ति चित्तासि अनुभव | सर्व सर्वीं देव भरला दिसे ॥ ३ ॥
ज्ञेय ज्ञाता ज्ञान उन्मनी विज्ञान | चित्त नारायण झालें त्याचें ॥ ४ ॥
आदि अंतीं हरि सर्व त्याचा जाला | परतोनि अबोला प्रपंचेसी ॥ ५ ॥
मुक्ताईचें चित्त निरंतर मुक्त | हरि हेंचि संचित आम्हांघरीं ॥ ६ ॥
मनुष्य जन्माच्या फेर्यातून बाहेर पडून शाश्वताच्या प्रवासात पुनर्जन्माचा फेरा चुकविण्यासाठी ’चित्त नारायण’ करण्याचे सांगणारी मुक्ताई म्हणजे अलौकिक भक्तीचे उदाहरणच. ज्ञानदेवांच्या पाठीवर मांडे भाजून वाघाची सवारी करणार्या चांगदेवांचे गर्वहरण करणारी सन्याशाची पोर. ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणत आर्त हाक देणारी बहिण, भक्त आणि नारायणाशी अव्दैता साधणारी साधक. सन्याशाची पोरं म्हणून हिणविण्यात आलेल्या ज्ञानोबा माऊलीची ती धाकटी बहिण. समाजाला ’नकुशी’ असलेली मुक्ताबाई तिच्या अविरत भक्तीने मुक्ताई झाली. तेच तर बहिणाबाई म्हणताहेत -
माझी मुक्ताई मुक्ताई
दहा वर्साचं लेकरू
चांगदेव योगियानं
तिले मानला रे गुरु
अरे सन्याशाची पोरं
कोनी बोलती हिनई
टाकी देयेल पोरांचं
कधी तोंड पाहू नही
घेती हिरीदाचा ठाव
ऐका ताटीचे अभंगात
उभा केला पांडुरंग
गह्यरले ग्यानदेव
डोये गेले भरीसन
असा भाग्यवंत भाऊ
त्याची मुक्ताई बहीन
सन्याशाची पोरं म्हणून त्यांना हिणविणार्या प्रकांड पंडित चांगदेवांंचं मुक्ताबाईने वयाच्या दहाव्या वर्षी गर्वहरण केलं. आपल्या ज्ञानामुळे दुराभिमानी झालेल्या चागंदेवांनी मुक्ताईला त्यांचं गुरु मानलं. मुक्ताईची महती केवळ चांगदेवांंच्या गर्वहरणापयर्र्ंतच नाही, तर ताटीचे अभंगातून साक्षात पांडुरंगाला विनविणारी संत मुक्ताबाई हिचं एक अढळ स्थान वारकरी सांप्रदायात आहे. आजच्या संदर्भात अशा अनेक ’मुक्ताई’ आपल्या भवताली दिसतात. समाजाने हिणवलेली, टाकून दिलेली ’नकुशी’ अनेकानेक क्षेत्रात नालौकिक मिळविताना आपण पाहतो. त्यामुळेच या सगळ्याच ज्ञानदेवांच्या मुक्ताईच्या जातकुळीतील, असेही म्हणता येईल.



0 Response to "मुक्ताई "
टिप्पणी पोस्ट करा