-->
खडे, खादाड आणि खडसे

खडे, खादाड आणि खडसे

विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी अद्याप सुरुच झालेली नाही. पितृपक्षाचा अडसर आणि त्यानंंतर उमेदवारी जाहीर करण्यात झालेला उशीर यानंतर आता अर्जांची छाननी, माघार असे शासकीय सोपस्कार आटोपल्यानंतर प्रत्यक्ष प्रचार सुरु होईल. एकीकडे आघाडीतून अनेक नेत्यांना पळवून आणून भाजप - शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. तर भाजप - शिवसेना युतीत उमेदवारी वाटपावरुन खूप गदारोळ होईल आणि नाराजांची फौज काँग्रेस आघाडीला येऊन मिळेल, असा होरा असलेल्यांचा भ्रमनिरास झाला.
युतीने विशेषतः भाजपने ’एक -एक को चून - चून के’ उमेदवारी दिली. अर्थात या उमेदवारांच्या यादीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचाच प्रभाव होता. यादी अमित शहा यांनी तयार केल्याचे सांगीतले जात असले तरीही फडणवीसांचाच प्रभाव राज्यातील सर्वच मतदारसंघांमध्ये स्पष्टपणे दिसतो आहे. भाजप उमेदवारांची यादी बारकाईने पाहिली तर फडणवीसांनी अडचणीत आणणारे खडे आणि खादाडांना पद्धतशीरपणे डच्चू दिला आहे. प्रकाश मेहता, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे असे काहीजण होते, त्यांच्या कार्यपद्धतीवर काँग्रेस आघाडीकडून प्रचारात मोठ्या प्रमाणात धुराळा उडाला असता. मेहता, तावडे, बावनकुळेंचे नाव उमेदवारांच्या यादीत नाही, याचे आश्‍वर्य आहे, असे म्हणूनच अजित पवार परवा जाहीररित्या बोलले.
सुग्रास जेवण व्यवस्थित सुरु असताना अचानक शेवटच्या भातात खडा लागावा, तशी सूतराम शक्यताही राहू नये म्हणून भाजपने वादग्रस्त ठरलेल्या किंवा ठरू शकलेल्यांची उमेदवारी कापली. तब्बल 22 विद्यमान आमदारांना घरचा रस्ता दाखवला, तर खडसेंसारख्या नेत्यालाही गुमान पक्षादेश मान्य करण्यापर्यंतची पाळी आली. ’तोबरा’ मंत्री मेहता, वादग्रस्त तावडे यांच्यावर बोलण्याचा आता मुद्दाच प्रचारातून बाद होणार आहे, किंवा त्या मुद्द्यांची धार बोथट होणार आहे. त्यातच चंद्रकांत पाटील यांना पुण्यातून उमेदवारी देण्यात आल्यानंतर ते त्यांच्याच मतदारसंघात अडकून पडणार आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष असले तरीही त्यांना राज्यभर प्रचारासाठी फिरुन राज्यस्तरीय नेतृत्व सिद्ध करणे जिकरीचे ठरणार आहे. असे भविष्यात अचानक दाताखाली येणारे खडे, मंत्रीपदाच्या कारकिर्दीत खा - खा खाल्लेले खादाड आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून मिरवून घेणारे खडसे या रणधुमाळीतून बाद झालेले आहेत.
--
पवारांच्या नातवाची 64 कोटींंची संपत्ती, डी. वाय. पाटलांंच्या नातवाकडे 35 कोटींची संपत्ती तर ठाकरेंच्या नातवाकडे 16 कोटींची संपत्ती... या सगळ्यांचे वय किती तर पस्तिशीच्या आत. हा पैसा कुठून आला, कोणी कमावून दिला हे उघड गुपित. त्यावर केवळ चर्चा होतील, त्यापुढे काहीही नाही. पुढल्या निवडणुकीच्या वेळी त्यांच्या संपत्तीत पाच - दहा पटींनी वाढ झालेली असेेल. आणि यावेळच्या निवडणुकीत आपापसात डोकी फोडलेले कार्यकर्ते कोर्टाच्या चकरा मारत असतील. तिकडे वरळीत पुतण्याविरुद्ध काका उमेदवार देत नाही. सासरा शिवसेनेत गेल्यानंतर लगेच जावयाला उमेदवारी मिळते. असे अनेक सेटींग दरवेळी निवडणुकीत दिसतात. पण सर्वसामान्य कार्यकर्ते नेत्यांच्या घोषणा देत घरादाराचे आणि नातेसंबंधांचे नुकसान करून घेतात. हा प्रकार कधीतरी बंद व्हायला हवा. मतदानाच्या आदल्या रात्री मिळणारी चपटी आणि एक नोट आयुष्यभरासाठी पुरत नसते, हेसुद्धा गरीब मतदारांना कळायला हवे. 

0 Response to "खडे, खादाड आणि खडसे"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel