मुख्यमंत्रीच शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर करतील, हे उद्धव ठाकरेंचे विधान त्यांचा वैताग जाहीर करण्यास पुरेसे आहे. मोदींंची नाशकातील सभा, अमित शहांचा मुुंबई दौरा हे सगळंच शिवसेनेला भाजपकडून झिडकारण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून पाहिले जात आहे. पण शिवसेना हा सगळा अपमान गिळून भाजपच्या मागे फरफटत जाण्यास तयार असल्याचे चित्र सध्या तयार झाले आहे. भाजपकडून एकाचवेळी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेेसला शह देण्याचे राजकारण सुरु आहे. काँग्रेसची दखलच कोणी घेत नाहीये. त्यामुळेच शिवसेनेचा प्रभाव असलेल्या ठिकाणी राष्ट्रवादीतील नेत्यांना पावन करून घेण्याचा सपाटा भाजपने लावला. राष्ट्रवादीला खिंडार पाडत असतानाच शिवसेनेच्या मतदारसंघांवर दावा करणार्यांना इनकमिंगसाठी प्राधान्य देण्यात आले.
त्यामुळेच राधाकृष्ण विखे पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, गणेश नाईक, शिवेंद्र राजे भोसले, उदयनराजे भोसले, पद्मसिंह पाटील, माणिकराव गावित, कृपाशंकर सिंह यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या डझनभर नेत्यांना भाजपने पावन करून घेतले. या सगळ्या नेत्यांचे मतदारसंघ किंवा त्यांच्या विभागातील राजकारण पाहता त्याठिकाणी भाजपच्या तुलनेत शिवसेनेचाच प्रभाव असल्याचे ध्यानात येते. उलटपक्षी शिवसेनेत दाखल झालेल्यांमुळे पक्षांतर्गत गटबाजीला खतपाणी मिळण्याची शक्यता आहे. भास्कर जाधव, जयदत्त क्षिरसागर, सचिन अहीर, दिलीप सोपल अशांमुळे शिवसेनेत गटबाजी वाढण्याचीच शक्यता अधिक आहे.
---
मनसेला लढावेच लागेल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे सध्या काहीच नसले तरीही राज ठाकरे हा ब्रँड त्यांच्याकडे आहे. त्या ब्रँडसाठी आणि त्यामागे उभ्या राहणार्या तरुणाईसाठी मनसेला विधानसभेची ही निवडणूक लढवावीच लागणार आहे. लोकसभा निवडणुकीतील सभांची गदीर्र् दोन्ही काँग्रेसच्या मतदानात परावर्तीत न झाल्याने आणि ईडी चौकशीच्या फेर्यात अडकल्याने राज ठाकरेे बॅकफुटवर आहेत. पण लोकसभा निवडणुकीनंतर ज्याप्रकारे राज ठाकरेे यांची खिल्ली सोशल मिडियात उडविली जात होती, त्याची गंभीर दखल त्यांनी घेणे आवश्यक आहे. राजकारणात विरोध होणे, टीका होणे समजण्यासारखे आहे. पण एखाद्यावर विनोद होणे, हे धोकादायक आहे, याचे उदाहरण ’राहुल गांधी’ यांच्या रुपाने समोर आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या भाषणांना ’मनोरंजन’ म्हणून पाहिले जाऊ नये, यासाठी ठोस भूमिका घ्यावीच लागणार आहे.
---
0 Response to "आयारामांचा मोठा प्रश्न"
टिप्पणी पोस्ट करा