-->
गयाराम - आयाराम

गयाराम - आयाराम

गयारामकडे काम करणार्‍या शांताबाईने नोकरी सोडली. विनाकारणची कटकट आणि मध्यंतरी गयारामकडे सुरु असलेल्या आर्थिक अडचणींमुळे पगाराला उशीर होत असल्यामुळे शांताबाई कंटाळली होती. वर्षानुवर्षे काम करूनही पगारवाढ नाही की समाधान नाही, पाहुणे - रावणे आले जास्तीचंं काम पडलं तरीही कधी जास्तीचा ढेला हातावर पडला नाही. उलट चार -दोन पैसे गाठीशी असावेत म्हणून कुठे दुसरीकडे काम केलं तर त्यातही गयारामचा हिस्सा ठरलेला असायचा. ’माझ्याकडे काम करण्याच्या वेळातच तू दुसरं काम केलंं म्हणून त्यात माझा वाटा’, असं गयाराम तिला कामावर ठेवतानाच म्हणाला होता. एखादा खाडा केला तरीही खरकटी भांडी तश्शीच ठेऊन दुसर्‍या दिवशी जास्तीचं काम करावं लागत असल्यामुळे शांता तशी नाराजच होती. शांताबाई ही गयारामकडे तशी नोकरीवर असली तरीही तशी नोकरीवर नव्हतीच. म्हणजे तिला बरंच काही गयारामने दिलं होतं. घरातलं गोड - धोड, कपडे - लत्ते, मान - पान सगळं तिलाही मिळत होतं. तिलाच काय गयारामकडे असलेल्या सगळ्या गडी माणसांना हे सगळं भरपूर मिळत होतं. त्याच्याच भरवशावर या गडी - माणसांनी चांगल्या दोन - दोन मजली वाड्या बांधल्या होत्या. त्यांच्या - त्यांच्या वस्तीत त्यांंनी पत मिळविली होती. गयारामकडे कामाला म्हणजे मोठ्ठा माणूस, अशी ओळख त्यांची झाली होती. गयारामच्या पेढीवर लागायची तशी पण थोडी छोटी रांग या गड्यांच्या मांड्यांवरही लागलेली असायची. गयारामची ही गडी- माणसं सांभाळायची खास पद्धत होती. तो भरपूर मिठाई एका भांड्यात भरून ठेवत असे. येता - जाता एखाद्या नोकरानं मिठाई खाल्ली तरीही तो त्याकडे काणाडोळा करे. पण भांडच रिकामं होण्याची वेळ आली की बरोबर एखाद्या गड्याला पकडायचा, आणि त्याला शिक्षा करायचा. त्यामुळे त्याची नोकरांमध्ये जरबही होती आणि प्रत्येकजण थोडीच मिठाई खायचा. मग गयारामसाठी भरपूर मिठाई उरायची. पण...
पण गयारामचं थोडं वय झालं, नजर धुसर झाली. मुलं - नातवंडं तरणीताठी होती. त्यांनी गडी - माणसांवर जरा बारीक लक्ष ठेवायला सुरुवात केली. त्यातच शांताबाईसह सगळे गडी मिठाईच्या आशेने टिकून होते. पण नव्या पिढीच्या राज्यात सगळीच मिठाई आपल्यासाठीच उरायला हवी, हा अट्टाहास सुरु झाला आणि गड्यांची उपासमार सुरु झाली. उलट सकाळी कामावर येताना सगळ्या नोकरमाणसांनी आपापल्या घरुन मिठाई आणावी, असा एक विचार सुरु असल्याचं थोड्या किलकिल्या असलेल्या दाराच्या फटीतून एका गड्यानं ऐकलं होतं. तेव्हापासून तो गायब झाला. गयारामच्या घरात ’आयतारामां’चं म्हणजे काहीही न करणार्‍या नव्या पिढीचंं राज्य सुरु झालं, अशी कुजबूज सुरु झाली. गयारामाच्या अगदी भिंतीला भिंत असलेल्या शेजारच्या घरातही तेच सुरु होतं. तिथं तर संपूर्ण घरच ’आयतारामां’नी ताब्यात घेतलेलं. कारण त्या घरातील मोठी, जाणती मंडळी केव्हाच त्यांनी अडगळीच्या खोलीत राहायला पाठवून दिली होती.
दुसरीकडे दूरवर आयाराम खूप वर्षांपासून रडत - खडत घर चालवित होता. वेतन, सुविधा, पैसा, मिठाई कशाचीही अपेक्षा न करता भरपूर काम करण्याची तयारी असलेल्याला आपल्या सेवेची संधी मिळेल, असाच गडी आपल्याला हवा आहे. थोडक्यात काय तर ’स्वयंसेवक’ म्हणून काम करायला कोणी तयार असेल तर त्यानेच आपल्याकडे यावं, असं आयारामने जाहीर करून टाकलं होतं. त्यामुळे त्याच्याकडे दोनच माणसं कामाला असायची. खूप गडी - माणसं असावीत असं त्याला वाटायचं, पण त्याच्या अटीमुळे सगळी अडचण होती. अनेक वर्षांपासून त्याच्याकडे असलेली दोन माणसं दररोज सकाळी यायचे, सगळी कामं आटोपली की आयारामानं ठरवून दिल्याप्रमाणे मागच्या आंगणात खड्डा खोदायची. दररोज थोडा - थोडा खोदल्यामुळे खड्डा हळूहळू पण चांगला मोठा होत होता. एक दिवस अचानक खोदकाम सुरु असताना आयारामचे दोन माणसं ओरडतच आली. त्यांना त्या खोल खड्ड्यात एक मोठ्ठा हंडा सापडला होता. आयारामच्या त्या गड्यांनी तो हंडा इमाने इतबारे त्याच्या स्वाधीन केला, कारण त्या हंड्याची लालसा त्या गड्यांंना कधीच नव्हती. मात्र हंडा सापडला आणि आयारामचं नशिबच पालटलं. साक्षात लक्ष्मी त्याच्याकडे पाणी भरू लागली. मग त्यालाही आपल्याकडे सर्वात जास्त गडी माणसं असावित असं वाटू लागलं. गावात काम करणारे जेमतेम तेवढेच. त्यातले दोनजण सोडले तर इतर सगळे गयारामच्या दिमतीला. मग आयारामने शक्कल लढवली. गयारामकडे जो सगळ्यात जास्त मिठाई खात असेल, त्याला दुप्पट पगारावर आणि पोटभर मिठाई देण्याचं त्याने जाहीर केलं. हळू - हळू गयारामचं घर रिकामं झालं. आयारामकडे गडी - माणसांचा राबता वाढला. जे लोक गयारामकडे अजुनही टिकून होते, त्यांना आयारामनं मिठाई चोर म्हणून बदनाम करण्यास सुरुवात केली. बदनामी नको म्हणून तेसुद्धा आयारामला शरण आले आणि गुपचूप कामं करू लागले. तरीही निष्ठावान वगैरे म्हणतात, तसे काही उरले होतेच. मग त्यांंच्याविरोधात, त्यांच्या नवर्‍याच्या विरोधात थेट माणसं पाठवून त्यांना काळ कोठडीत डांबण्याचा आदेशच आयारामानं दिला. मग काय गयारामचं अख्खं घर रिकामं झालं. त्याच्या भरोशावर आधीच माड्या, गाड्या असलेले आणि मिठाई खाऊन अजीर्ण होण्याच्या स्थितीत असलेले गडी आता आयारामच्या घरी राबताना दिसताहेत. येणार्‍या काही दिवसांत आयारामच्या घरावर त्यांचंच राज्य असेल, असं त्यांना वाटतंय... आणि आयारामच्या सुरवातीच्या खडतर काळातील ते दोन गडी? ते कुठे आहेत? त्यांच्याकडे आता आयारामनं काय जबाबदारी दिलीए?... त्यांनी वर्षानुवर्ष केलेल्या सेवेबद्दल आयारामनं त्यांना अत्यंत सोप्पं काम दिलंय, नव्याने दाखल झालेले सगळे गडी - माणसं झोपण्यापूर्वी व ते सकाळी उठल्यानंतर सतरंज्या निट टाकायच्या आणि उचलून घडी करून ठेवायच्या.
(अगदी बरोब्बर... आज सुरु असलेल्या पक्षांतराशीच या गोष्टीचा संबंध आहे.)

0 Response to "गयाराम - आयाराम"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel