-->
उतू नका, मातू नका...

उतू नका, मातू नका...

यंदाच्या निवडणुक निकालाचे एका शब्दात विश्‍लेषण करायचे झाल्यास ही त्सुनामी नव्हे तर ’त्सुनमो’ होता, असं म्हणावं लागले. एका व्यक्तीवर झालेली प्रचंड टीका, घृणास्पद टीप्पणी, सोशल मिडियापासून मिळेल त्या माध्यमातून रोखण्यासाठी झालेले प्रयत्न या सगळ्यातून भाजपने विजयश्री खेचून आणली त्याचे सर्वाधिक श्रेय हे नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला द्यावेच लागले. भाजपने ’दो से दोबारा’ पर्यंतचा केलेला हा प्रवास निश्‍चीतच विश्‍लेषकांना अचंबित करणारा ठरला. पुन्हा भाजपचीच सत्ता येईल, हे स्पष्ट होते. तीनशेपेक्षा अधिक जागा भाजपप्रणित आघाडीला मिळतील याचाही अंदाज होता, मात्र या जागा थेट साडेतीनशेपर्यंत पोहचतील हा अंदाज कदाचित कोणालाच नसेल. राज ठाकरे म्हणाले तसे ’अनाकलनीय’ असे या निकालात काहीही नव्हते. कारण प्रत्येक मतदारसंघात ज्यापद्धतीने भाजपने राजकारण केले, ते पाहता व तटस्थपणे समजून घेताना त्यात त्यांना यश मिळणे अपेक्षितच वाटत होते. परंतु निवडणुकीच्या काळात आणि त्याआधीपासून अनेकजण भाजपविरोधाने प्रचंड पेटून उठले होते. कोणत्याही परिस्थितीत भाजप नको म्हणणारे काही दिवसानंतर ’मोदी नको’ असे म्हणू लागले होते. गडकरींच्या व्यक्तीमत्वाचे अशा लोकांकडून कौतुक सुरू होते. तिथूनच भाजपच्या विजयाची चाहूल विरोध करणार्‍यांंना लागल्याचे दिसत होते. एकीकडे ’मोदी - मोदी’चा तर दुसरीकडे ’चोर है’चा उन्माद सुरु होता. सोशल मिडियावर तर देश मोदी समर्थक आणि मोदी विरोधकांमध्ये वाटला गेल्याचेच चित्र दिसत होते. सोशल मिडियावरच्या कॉमेंट्ससुद्धा काहीजणांना सहन न होणार्‍या होत्या. सरकारचा एखादा निर्णय योग्य म्हटला की तुम्ही भक्त ठरवले जात होते, अयोग्य म्हटला तर चमचे. 
हे शत्रुत्व आता संपले आहे. निवडणूक झाली आणि आपण आपल्या देशाचे सरकार नुसतेच निवडले नाही तर बहुमताने निवडून दिले आहे. भाजपच्या या विजयामागे असलेल्या अनेक कारणांची मिमांंसा करता येईल. राहुल गांधी यांना मोदींच्या विरोेधात प्रोजेक्ट करणे यातच मोदींचा पहिल्या टप्प्यातील विजय सामावलेला आहे. तशी असंख्य कारणे आहेत. यशाचे अनेक बाप तयार होतात, तसे निवडणुकीच्या विजयाची अनेक कारणे असतात. तर पराभवाचे खापर एखाद्या एकट्यावर फोडले जाते. येणार्‍या काळात राहुल गांधी यांच्यावर ते फोडण्यात येईलही.
मोदी निवडून आल्यानंतर जल्लोष व्हायलाच हवा. त्यांच्या समर्थकांनी तो करायला कोेणाची हरकत असण्याचे कारण नाही. पण जल्लोषाचे रुपांतर उन्मादात होेण्याची भीती आहे. ते होता कामा नये. दुसर्‍यांदा सत्ता मिळाल्यानंतर मोदींंना स्मरण झाले ते भाजपच्या ’दो से दोबारा’ या  प्रवासाचे. ज्यावेळी भाजपचे केवळ दोन खासदार निवडून आले होते, त्यावेळी काँग्रेसकडे अशाच प्रकारचे बहुमत असायचे. आज परिस्थिती बदलली आहे. दुसर्‍यांदा प्रचंड मताधिक्याने निवडून आल्यानंतरही मोदींना तो दोनच खासदार निवडून येण्याचा काळ आठवला. तो प्रत्येक मोदी समर्थकाने स्मरणात ठेवायला हवा. सत्तेेचा अमरपट्टा कोणालाच मिळत नाही, हे त्यायोगे ध्यानात राहील. ते ध्यानात रहायलाच हवे. तरच विरोधकांवर यापुढे विखारी टीका होणार नाही. मोदींवर होणार्‍या विखारी टीका ज्यांना आवडली नाही, त्यांनी मतदान यंत्रातून टीका करणार्‍यांना उत्तर दिले. तोच प्रकार उलटण्याची शक्यताही असते, हे आता विजयाने उन्मत्त होण्यापूर्वी कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यायला हवे. शरद पवार असतील नाहीतर राज ठाकरे किंवा ममता बॅनर्जी किंवा राहुल गांधी असतील यांनी मोदींवर निवडणुकीच्या काळात केलेली टीका स्वीकार्ह्य नव्हतीच, त्यामुळेच मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. पण तोच प्रकार निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांकडून व्हायला नको.
प्रत्येक मतदार हा काही राजकीय कार्यकर्ता नसतोे. त्यामुळे त्याला कार्यकर्त्यांच्या उन्मादाची चीड यायला वेळ लागत नाही. सत्ता हे साधन आणि साध्य नाही, हे लक्षात ठेऊन काम करणार्‍याच्या पाठीशी जनता उभी राहते. पण सत्तेच्या उन्मादात कंबरेचे सोडून डोक्याला गुंडाळले तर चंबू गबाळे गुंडाळून घराचा रस्ताही हीच जनता दाखवते. त्यामुळे विजयी मिरवणुका झाल्यानंतर किमान जबाबदारीचे भान सत्ताधारी म्हणून गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या कार्यकर्त्यांनी दाखविण्याची गरज आहे. नथुरामसारख्यांचे उदात्तीकरण करण्यापासून विरोधी विचार मांडणार्‍यांना शिविगाळ करण्यापयर्र्ंतचेे सगळे प्रकार यापुढे टाळायला हवे. इतिहासाची मोडतोड करून काहीही मांडणार्‍यांप्रमाणेच, आम्ही सांगतोे तोच इतिहास खरा हा अट्टाहास करणार्‍यांचाही लोकांना वीट येतो. सत्तेचा माज, मस्ती बोलण्यातून दिसू लागली की लोक पयार्र्य शोधू लागतात. निवडणुकीनंतरही जर अशाच प्रकारे एकमेकांवर चिखलफेक होत असेल, तर देश खरोखर वाटला जाईल. हिंदू - हिंदू म्हणून माज दाखवणार असाल तर इतर धर्मियांना असुरक्षित वाटू शकतंं. हिंदू आहात, सहिष्णू आहात हे वर्तणुकीतून दिसायला हवं. ज्या मोदींसाठी कायर्र्कर्ते टोकाची भूमिका घेतात, तेच मोदी सबका साथ, सबका विकास म्हणतात. नथुरामाचे कौतुक करणार्‍यांची पाठराखण करणार्‍यांनी मोदींना स्वच्छ भारत अभियानात गांधीजींचा चष्माच लागतो, तिथे ते नथुरामाची बंदूक वापरू शकत नाही, हे लक्षात घ्यायला हवं. पाकिस्तानात निघून जा म्हणून सुनावणार्‍यांची गर्दी पाठीशी असुनही मोदी पाकिस्तानातील दहशतवादाला विरोध करतात, पाकिस्तानला नाही, हा फरक लक्षात घ्यायला हवा. स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी देशहिताला प्राधान्य देणारे सरदार वल्लभभार्ई पटेलच हवेत, इतर कोणीही कट्टरपंथी तिथे चालत नाही. म्हणूनच मोदी भक्त म्हणवून घेणार्‍यांनी, चौकीदाराचे पद नावासमोर लावणार्‍यांनी त्यांच्या नेत्याच्या वागण्यातील किमान संकेत लक्षात घ्यायला हवेत. त्यामुळे उतू नका, मातू नका... हे मोदींनीच कार्यकर्त्यांना आणि पक्षातील बोलभांडांना खडसावून सांगण्याची गरज आहे.

- राज ठाकरे धोका ओळखा (उद्या)

0 Response to "उतू नका, मातू नका..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel