-->
फिरसे एक बार ...

फिरसे एक बार ...

एक्झिट पोलची आकडेवारी येण्यास सुरूवात झाली आहे. पुढचे तीन दिवस तोंडाला फेस येईपर्यंत टिव्हीवर पोटतिडकीने चर्चा करणारे अनेक विव्दान आता दिसतील. सगळे अंदाज खोटे ठरवत किंवा आपण इतका विरोध करूनही भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सरकार स्थापनेत स्पष्ट बहुमताचा आकडा पार करता येईल, यावरही या विव्दानांंचा विश्‍वास नसेल आणि मग त्यातून पुन्हा मोदी आणि अमित शहांच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका सुरू होईल. या चर्चेचा शेवट कदाचित राहुल गांंधी यांच्या ’नैतिक विजय’ झाल्याच्या ’समाधानकारक निष्कर्षापर्यंत पोहचेल. प्रत्यक्षात निवडणुकीच्या रिंगणात जोे जिंकला तोे सिकंंदर. त्यामुळे मतांची टक्केवारी वाढली की घटली, कुठल्या राज्यात किती मताधिक्य मिळालंं हा विषय केवळ राजकीय विश्‍लेषकांपुरता मयाृदित होतो. राहिला प्रश्‍न नैतिक विजयाचा तर हा शब्दच मुळी हरलेल्याच्या सांत्वनासाठी शोधून काढण्यात आला असावा. कारण पराभूत झालेल्याचा ’नैतिक विजय’ आणि प्रत्यक्ष आकडेवारीत विजयी झालेल्याचा विजय म्हणजे ’अनैतिक’ किंवा ’नैतिक पराभव’ कसा हे दिवसभर टीव्हीवर तोंड वाजवत बसणार्‍यांनाच कळू शकेल. 
भाजपची यावेळीही लाट होतीच, हे निकालानंतर मान्य होईल. एनडीए 305 चा जादुई आकडा पार करणार आहे, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. महाराष्ट्रातही फारसा काहीच बदल होणार नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला त्यांंच्या पूर्वीच्याच जागा वाचवता आल्या तरी त्यांना खूप मिळालंं, असं मानावं लागले. वंचित आघाडीला भोपळा फोडणे शक्य होणार नाही. उलटपक्षी वंचित आघाडीच्या उमेदवारांमुळेच भाजप - शिवसेनेचे उमेदवार काही ठिकाणी यंदा वाचलेले दिसतील. (मतदारसंघनिहाय विश्‍लेषण याठिकाणी देणे अशक्य आहे. पण प्रत्यक्ष निकाल हाती आले की तपासून पाहा.) वाराणसीतून मोदी पाच लाखांच्या फरकाने निवडून येतील. सेलिब्रेटी उमेदवारही महाराष्ट्रात घरीच बसतील, अशी शक्यता आहे. मुंबईत बदल झालाच तर दोन जागा काँग्रेसकडे येतील. दिल्लीतील सगळ्या सातही जागांवर भाजपच असेल हे केजरिवालांनी मुस्लिम मतांबाबत सांगीतलेल्या गणितातून स्पष्ट होतं. तर पश्‍चिम बंगालमध्ये उत्तर प्रदेशातून होणारे नुकसान भाजपने भरून काढले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद पुन्हा रिकामं राहण्याचीच शक्यता अधिक आहे.
थोडक्यात काय तर मोदी - शहा पुन्हा जिंकतील. व्हायचा त्यांचा नैतिक विजय वगैरे होईल. यंदाच्या निवडणुकीत पहिल्या दिवसापासून मोदींना हरविण्याची रणनितीच कोणत्याही पक्षाकडे दिसली नाही, हे या निकालांमागचं सत्य आहे. काँग्रेेस संभ्रमावस्थेत आणि प्रादेशिक पक्ष त्यांची स्वतंत्र अस्मिता जपण्याच्या नादात त्यामुळे मोदीविरुद्ध एकत्रित प्रयत्न झालेच नाहीत. शिवाय मोदींविरुद्ध सक्षम चेहरा आजही विरोधी पक्षांकडे नाही. सोशल मिडियावर मोेदी - शहांवर होणारी टीका एकीकडे आणि मोदींना पर्याय शोधताना आलेले नैराश्य दुसरीकडे अशी स्थिती गेल्यावेळी होती, यावेळीही तिच स्थिती कायम होती.
राहुल यांचे जानवे, गोत्र उपयोगाला येणार नाही. प्रियंका यांचा प्रचारही प्रभावी राहणार नाही. काँग्रेसची न्याय योजना अंमलात आणण्याचे आश्‍वासन चालणार नाही, हे दिसत असूनही त्यात हवा भरत राहणार्‍यांना नैराश्याचा झटका येण्याची शक्यता आहे. कोणत्यातरी एका पक्षाचे कार्यकर्ते म्हणून ज्यावेळी विश्‍लेषण केले जाते, त्यावेळी तोंडावर आपटण्याची शक्यता अधिक असते, हे विसरुन निवडणुकीच्या काळात दावे केले जात होते. नेमकी हिच चूक भाजपच्या पथ्यावर पडते. गेल्यावेळी मोदींंच्या विजयाचे श्रेय सोशल मिडियाला दिले गेले. नंतर इव्हीएमला दोष लावला गेला. यावेळीही तेच होईल आणि महाराष्ट्राच्या विधानसभेतही तेच दिसेल. भाजपने ब्लॅकमेल केले हा एक आरोप नव्याने कदाचित निकालाच्या दिवशीनंतर सुरू होईल. पण कुठल्या कारणाने भाजपने ब्लॅकमेल केले, हे जनतेच्या दरबारात सांगण्याचे धारिष्ट्य असे आरोप करणार्‍यांना दाखवावे लागणार आहे आणि ते शक्य नाही. त्यामुळे सक्षम पर्याय नसल्यामुळे फिर एक बार, मोदी सरकार हे मान्य करावे लागणार आहे.

0 Response to "फिरसे एक बार ..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel